<
देशभरातील १ हजार साधू, संत तर हजारो भक्त राहणार उपस्थित
जळगाव-(प्रतिनिधी)- येथील जळगाव भुसावळ नॅशनल हायवे क्र. ६ रस्त्यावरील दूरदर्शन टॉवरजवळील स्वामीनारायण मंदिरात गुरुवारपासून विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून, १० ते १७ डिसेंबरपर्यंत मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन केले आहे.
देशभरातील १ हजार साधू या महोत्सवाला उपस्थित राहतील. विष्णू यागासह विविध धार्मिक विधी या महोत्सवात केले जातील. या महोत्सवासाठी पाच हजार स्वयंसेवक सेवा देणार असल्याची माहिती स्वामीनारायण मंदिराचे निर्माते पुरूषोत्तम शास्त्री यांनी मंगळवारी (ता. ३) पत्रकार परिषदेत दिली. मंदिराचे नयन स्वामी, गुणसागर स्वामी, घनशाम स्वामी, रघुनंदन स्वामी आदी यावेळी उपस्थित होते.
गेल्या आठ वर्षापासून या मंदिराची उभारणी सुरू आहे. बन्सीपाड लाल दगडात कलात्मक कोरीव काम व कलाकुसरीने युक्त असे मंदिर साडेतीन एकर जमीन क्षेत्रात बांधण्यात. त्यात ८० हजार घनफूट बन्सी पाड दगडाचा वापर झाला. त्यात मुख्य शिखरासह एकूण ११ शिखर असून, महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक अद्भूत मंदिराची उभारणी केली आहे. त्यात १०८ स्तंभ ६० कमानी मुख्य घुमट भगवान विष्णूचे २४ अवतार कलात्मक पद्धतीने हुबेहुब प्रतिकृती प्रत्यक्ष भावदर्शन देतात. त्यात ५७ गणपती मूर्ती वेगवेगळ्या भावमुद्रात कोरलेले आहेत. मंदिरात विठ्ठल रूक्मिणी, शिव, हनुमानजी, गणेशजी, चारधाम देवांचे दर्शन होणार आहे. मंदिर परिसरात हनुमानजी यांची ५४ फूट उंचीची ग्रनाईटची दगडातील मूर्ती उभारली आहे.
श्री स्वामीनारायण मंदिरात १० ते १७ डिसेंबरदरम्यान मूर्ती प्राणप्रतिष्ठा, तर ५ ते १७ डिसेंबरदरम्यान सांस्कृतिक प्रदर्शन होईल. १० ते १७ डिसेंबरपर्यंत भागवत कथा सप्ताह होणार आहे.
आहे. या उत्सव काळात गादिपती आचार्य राकेशप्रसाद महाराज यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. सुमारे १ हजार साधू व महोत्सवासाठी देश-विदेशातून येणारे भक्तांची व्यवस्था ही जळगाव जिल्ह्यासह गुजरात येथील दोन हजार स्वयंसेवक सेवा देणार आहे.
असे आहेत कार्यक्रम
महोत्सवात ५ ते १७ डिसेंबरदरम्यान सांस्कृतिक प्रदर्शन सकाळी ९ ते १२, दुपारी ४ ते रात्री १० दरम्यान असेल, १० डिसेंबरला दुपारी तीनला शोभायात्रा निघेल. भागवत कथा, सायंकाळी सहाला उत्सवाचे उदघाटन होईल. ११ डिसेंबरला सकाळी सातला अखंड धून, महाविष्णुयाग, चतुर्वेदी पारायण, कथेला प्रारंभ होईल. सायंकाळी सहाला गीता जयंती पूजन व रात्री साडेआठला ५४ फूट हनुमानमूर्ती अनावरण होईल. बारा डिसेंबरला सकाळी आठला आरोग्य शिबिर, आय हॉस्पिटल उद्घाटन, रात्री साडेआठला मंदिर लाइट व साउंड शो, १३ डिसेंबरला सकाळी अकरापासून मूर्ती प्राणप्रतिष्ठा, महाविष्णुयाग समाप्ती, भावपूजन, घरसभा कार्यक्रम होईल. १४ डिसेंबरला सकाळी आठला हनुमान चालिसा पठण, सत्संग, शहीद सैनिक परिवारांचा सन्मान, नृत्य-नाटिका कार्यक्रम. १५ डिसेंबरला दुपारी एकला महिला-बालमंच कार्यक्रम, १६ डिसेंबरला मंदिर पुजारी गौरव होईल.