<
जामनेर-(प्रतिनिधी) – आरोग्य विभाग जिल्हा परिषद जळगांव च्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर व जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ रमेश धापते यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात १,४७,०५९ मुला- मुलींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
यामधे शहरी भागातील ३७१८१ व ग्रामीण भागातील १,०९,८७८ मुला- मुलींचा समावेश आहे.
जंतामुळे मुला मुलींमध्ये रक्तक्षय,कुपोषण,सतत थकवा,शारीरिक व मानसिक वाढ न होणे, पोटदुखी,डोकेदुखी इ.समस्या जाणवत असतात.यावर उपाययोजना म्हणून आरोग्य विभागामार्फत अंगणवाडी विभाग व शिक्षण विभाग यांच्या सहकार्याने तसेच शाळा बाह्य मुला मुलींना आशा स्वयंसेविका मार्फत वय वर्ष २ ते १९ वर्षापर्यंत मुला मुलींना जंतनाशक गोळ्या देवून राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्यात येतो.
राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा तालुका स्तरीय शुभारंभ ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच एकलव्य प्राथमिक विद्यांदिर जामनेर येथे करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.चंद्रमणी सुरवाडे,डॉ.जितेंद्र वानखेडे हे होते. स्नेहल पाटील व योगेश बाविस्कर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.प्राचार्य राजेंद्र सोनवणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. व्ही.एन. पाटील यांनी सूत्रसंचालन तर मुख्याध्यापक देविदास काळे यांनी आभार मानले.
सदर प्रसंगी आरोग्य विभागाच्या वतीने डॉ.निलेश पाटील,डॉ. धनंजय पाटील,डॉ.स्वाती विसपुते,डॉ.अनिता राठोड,डॉ.कविता काळे,डॉ.हर्षाली गोसावी,डॉ.पंकज पाटील यांच्यासह टीम द्वारे आरोग्य तपासणी करून वैयत्तिक स्वच्छतेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले व राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्यात आला.