<
भुसावळ – (प्रतिनिधी) – डॉ. भा.ल.भोळे विचार मंच नागपूर आणि राज्यशास्त्र व इतिहास विभाग, यशवंत महाविद्यालय सेलू जिल्हा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय राजकीय व्यवस्था:निवडणूक प्रक्रिया आणि मतदार वर्तन या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र वर्धा येथे दिनांक 7 डिसेंबर 2024 शनिवार रोजी आयोजित करण्यात आले होते.या चर्चासत्रात आयोजित राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धा मध्ये सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय भालोद तालुका यावल येथील राज्यशास्त्र विषयाचे विभाग प्रमुख डॉ.सुनील नेवे यांना तृतीय क्रमांक चे पारितोषिक प्राप्त झाले. “समकालीन भारतीय लोकशाहीतील निवडणूक आयोगाची भूमिका” या विषयावर डॉ.सुनील नेवे यांनी शोधनिबंध सादर केला. या प्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते डॉ.सुनील नेवे यांचा सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र, व रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. भा.ल.भोळे विचार मंचाचे अध्यक्ष शेषकुमार एरलकर, सचिव डॉ. अशोक काळे ,प्राचार्य डॉ. संदीप काळे ,डॉ. अनंत रिंधे,डॉ. योगेश उगले(परतवाडा, यवतमाळ), डॉ.दिपाली घोगरे (पातूर,अकोला), श्री कथन शहा(मुंबई) डॉ.प्रवीण भागडीकर राज्यशास्त्र अभ्यास मंडळ अध्यक्ष, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. सुनील नेवे यांचा सत्कार करण्यात आला.
या शोधनिबंधात डॉ. सुनील नेवे यांनी भारतातील निवडणूक आयोगाच्या भूमिकेविषयी आपले मते व्यक्त केले. डॉ.सुनील नेवे यांनी असे प्रतिपादन केले की, भारतातील निवडणूक आयोग जगातील सर्वात उत्तम असा निवडणूक आयोग आहे.भारतीय लोकशाही चौकटीतील एक कोनशिला म्हणून निवडणूक आयोगाकडे पाहता येईल. जगात भारत हा असा एकमेव देश आहे की, लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणूक आयोग हा अत्यंत निर्भीडपणे निष्पक्षपणे आपली भूमिका बजावीत आहे.1950 पासून आज पर्यंत ज्या ज्या निवडणुका देशात झाल्या या सगळ्या निवडणुकीचे संचालन निवडणूक आयोगाने केले. हिंसाचार विरहित निवडणुका पार पाडण्याचा प्रयत्न केला. अत्यंत दुर्गम असलेल्या डोंगराळ भागात, पहाडात,नक्षलग्रस्त भागात वास्तव्य असलेल्या प्रत्येक मतदाराला मतपेटीपर्यंत जाऊन मतदान करण्याची संधी निवडणूक आयोगाने प्राप्त करून दिली.त्या साठीच्या सगळ्या व्यवस्था केल्या.देशातील मतदानाचा टक्का अधिकाधिक वाढावा यासाठी वेगवेगळे प्रयत्न निवडणूक आयोगाने केले. स्वीप म्हणजेच सिस्टिमॅटिक वोटर एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन या मोहिमेद्वारे अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे म्हणून विशेष प्रकारचे प्रयत्न भारतातील निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेले आहे. ही बाब लोकशाही असलेल्या भारताच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. भारतात निवडणूक आयोगाने आपली भूमिका निर्भीडपणे निष्पक्षपातीपणे पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला दिसून येतो. विशेष करून भारताचे माजी निवडणूक आयुक्त टी एन शेशन यांचा कार्यकाळ जनतेच्या लक्षात राहण्यासारखा राहिला. मात्र अलीकडच्या काळात निवडणूक आयोगाकडे पाहण्याचा सामान्य जनतेचा दृष्टिकोन थोडा बदललेला दिसून येतो निवडणूक आयोगाबद्दल शंका निर्माण करण्यात आली .याकडे डॉ. सुनील नेवे यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्रात अलीकडे झालेले पक्षांतर,त्यातून झालेली पक्षाची फोडाफोडी, यासंदर्भात निवडणूक आयोगाने घेतलेली भूमिका संदिग्ध स्वरूपाची होती असा आरोप निवडणूक आयोगावर केला गेला.राजकीय गुन्हेगारीकरण टाळण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाने करायला पाहिजे होता त्यात ते पूर्णपणे यशस्वी होवू शकले नाही. 17 c चे फॉर्म वेबसाईटवर कमी वेळेत प्रसिध्द होणे गरजेचे होते,परंतु त्याबाबत निवडणूक आयोग अपयशी ठरल्याचे दिसून आले .कोणतीही सार्वत्रिक निवडणूक संपन्न झाल्यावर त्याचे रेकॉर्ड किमान एक वर्ष ठेवले पाहिजे असे असताना 2019 च्या निवडणुकीमध्ये सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाने असे रेकॉर्ड आमच्याकडे उपलब्ध नाही अशी माहिती दिली, त्यामुळे निवडणूक आयोगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सामान्य जनतेचा बदलला.निवडणुकीच्या काळात मतदारांना धमकावणे,सोशल मीडियाचा गैरवापर करणे, पैशांचा वाढता प्रभाव याबद्दल निवडणूक आयोग गंभीर दखल घेऊ शकला नाही. आजपर्यंत खोटे प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्या किती उमेदवारांना शिक्षा झाली?याचे उत्तर निवडणूक आयोग देऊ शकला नाही. सरकारी हिशेब वेळेवर दिले नाही म्हणून किती लोकांना शिक्षा झाली हे सामान्य जनतेला कळाले पाहिजे. वर्तमानपत्रांमध्ये भरमसाठ पेड न्यूज उमेदवारांकडून दिल्या जातात त्याची चौकशी होऊन किती उमेदवारांवर गुन्हे दाखल झाले? याची माहिती निवडणूक आयोगाने द्यावी. मतदानाच्या तारखा जर निवडणूक आयोग ठरवणार असेल तर त्या तारखा जाहीर करण्यापूर्वी राजकीय पक्षांना कळतात कश्या ? या प्रश्नाचे उत्तर निवडणूक आयोग सक्षम पणे अद्याप पर्यंत देऊ शकला नाही.
निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांना जे अधिकार मिळालेले आहेत ते मर्यादित स्वरूपाचे आहे जर आपल्या देशात निवडणूक आयोग स्वतंत्र आहे तर निवडणूक आयोगाला त्यांचे अधिकार वापरण्याची मुभा मिळावी. निवडणूक आयोगाची प्रतिष्ठा जपावी, निवडणूक आयोग जगातील सर्वश्रेष्ठ आयोग म्हणून कायमस्वरूपी स्वरूपी टिकावा, याकरता निवडणूक आयोगाने जनतेच्या मनातील शंकांचे निरसन सातत्याने करावे असे प्रतिपादन डॉ. सुनील नेवे यांनी केले.