जळगाव – (प्रतिनिधी) – संयुक्त राष्ट्र संघाने नुकताच २१ डिसेंबर हा दिवस ‘जागतिक ध्यान दिन’ म्हणून जाहीर केला. मूळजी जेठा महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी यांच्या वतीने प्रथम जागतिक ध्यान दिनानिमित्त ध्यान साधना कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
ही ध्यान साधना कार्यशाळा २१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजता आनंदयात्री योग हॉल, सोहम योग विभाग या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून विपश्यना ध्यान साधना समिती जळगाव चे आचार्य आणि साधक उपस्थित होते. या ध्यान कार्यशाळेमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांना ध्यान दिवसाचे महत्व सोहम योग विभागाचे संचालक डॉ. देवानंद सोनार यांनी पटवून दिले. त्यानंतर विपश्यना ध्यान साधना कशी महत्त्वाची आहे आणि आधुनिक युगातील वेगवेगळ्या समस्यांना विपश्यना ध्यान साधनेच्या माध्यमातून कसे सोडवता येईल याविषयीचे मार्गदर्शन यावेळी विद्यार्थ्यांना करण्यात आले. त्याचबरोबर आनापान सती या विपश्यना ध्यान साधनेचा प्रारंभिक प्रात्यक्षिक अभ्यास सुद्धा या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आला.
ध्यान साधना सर्व सामाजिक आणि व्यक्तिगत समस्यांवरील महत्त्वाचा उपाय आहे आणि आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी ध्यान साधना अत्यंत आवश्यक आहे. त्या उद्देशानेच विद्यार्थ्यांना ध्यान साधनेचे महत्त्व कळावे याकरिता या ध्यान साधना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य सं. ना. भारंबे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोहम योग विभागातील प्रा. पंकज खाजबागे, प्रा. ज्योती वाघ, निसर्गोपचार समन्वयक प्रा. अनंत महाजन, निसर्गोपचार समन्वयीका प्रा. सोनल महाजन, प्रा. श्रद्धा व्यास यांनी तसेच सोहम योग विभागातील विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली.