जळगाव, दिनांक 2 जानेवारी (जिमाका वृत्त ) : जळगावातील मोहाडी येथील महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण बळीराम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ०१ जानेवारी २०२५ रोजी जिल्हा महिला व बाल रुग्णालय मोहाडी येथे डॉ. मिलींद चौधरी (एम. एस. सर्जन) जळगाव व डॉ. चंदन महाजन (स्त्रीरोग तज्ञ) यांनी दुर्बिणीद्वारे गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.
डॉ. किरण बळीराम सोनवणे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाने भूलतज्ञ डॉ. प्राची सुरतवाला यांनी रुग्णाला भूल देऊन अति जोखमीचे असे हे ऑपरेशन पार पाडले व रुग्णालयातील अधिपरिचारीका श्रीमती. दिपाली बढे व शस्त्रक्रिया विभागातील कर्मचारी यांनी यशस्वीपणे पार पाडावी यासाठी प्रयत्न केले.
मोहाडी येथील महिला व बाल रुग्णालयात दुर्बिणीद्वारे होणाऱ्या शस्त्रक्रिया जसे गर्भपिशवी काढणे, अपेंडिक्स काढणे, हर्निया दुरुस्ती या सर्व शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विनामुल्य होतात तरी जिल्ह्यातील सर्व गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा व अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसंबधी मदतीसाठी श्री. चेतन परदेशी ९०६७५३१९२३ व श्री. राहुल पारचा ९६७३६३९७४१ यांना संपर्क साधावा असे आवाहन डॉ. किरण बळीराम सोनवणे यांनी जिल्ह्यातील रुग्णांना केलेले आहे.