जळगाव-(प्रतिनिधी) – येथील लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयाच्या एम एस डब्ल्यू द्वितीय वर्षाच्या क्षेत्रकार्या अंतर्गत ममुराबाद येथे बालविवाह निर्मूलन आणि प्रतिबंध या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर कार्यक्रम हा महाराष्ट्र शासनाचा महिला व बालविकास विभाग, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय जळगाव यांचे कडील विशेष पत्र आणि मा. जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडील दिनांक १६ डिसेंबर २०२४ रोजीच्या सभेतील सूचनेप्रमाणे आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत ममुराबाद येथे जनजागृती करताना महाविद्यालयांतील प्राध्यापक आणि क्षेत्रकार्य पर्यवेक्षक डॉ. शाम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. कार्यक्रमासाठी एम एस डब्ल्यू द्वितीय वर्षाचे समाजकार्याचे प्रशिक्षणार्थी महेश अहिरे, पल्लवी पाटील, पूजा वाणी, करिष्मा सपकाळे, सागर बोरणारे इत्यादी विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून ममुराबाद गावात विविध भागांमध्ये पाच ठिकाणी पथनाट्याद्वारे जनजागृती केली. पथनाट्या मध्ये बालविवाह म्हणजे काय, बालविवाह कशा पद्धतीने केले जातात, समाजामध्ये बालविवाह बद्दल असलेली मते, पारंपारिक दृष्टिकोन त्याचप्रमाणे बालविवाह केल्यामुळे कशा प्रकारचे दुष्परिणाम होऊ शकतात किंवा शासनाच्या वतीने कशाप्रकारे कार्यवाही होऊ शकते याबाबतची ग्रामस्थांमध्ये जागृती केली. याप्रसंगी समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने क्षेत्र कार्य समन्वयक प्रा. डॉ. नितीन बडगुजर उपस्थित होते.
पथनाट्य कार्यक्रमाचे विशेष म्हणजे सदर पथनाट्यमधील गावातील शालेय विद्यार्थ्यांचा आणि ग्रामस्थांचा देखील त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. गावातील लोकांनी सहभागी पद्धतीने पथनाट्य व कार्यक्रमासाठी सर्व प्रकारचे साहित्य सुविधा पुरविले. आपल्या मुलांना सदर पथनाट्यत सहभागी होण्यास स्वतःहून सांगितले. त्याचप्रमाणे गावकऱ्यांनी आमच्या घरात कोणत्याही प्रकारचे बालविवाह होणार नाही किंवा परिसरात आम्ही होऊ देणार नाही याविषयीची शपथ देखील घेण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून बालविवाह प्रतिबंध या विषयावर ममुराबाद पंचक्रोशी मध्ये कार्यक्रम सातत्याने सुरू ठेवले जातील असे क्षेत्र कार्य पर्यवेक्षक प्रा डॉ शाम दामू सोनवणे, कार्यकर्ते विद्यार्थ्यांनी सांगितले. याप्रसंगी गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.