जळगाव-(प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेच्या विविध आस्थापनांवर काम करणारे कर्मचारी व अधिकारी यांच्यात संगीत भावना बळावी त्यासोबतच दैनंदिनरीत्या शासकीय कामकाज करीत असताना येणारा ताण तणाव दूर होऊन कर्मचाऱ्यांचे आरोग्य सदृढ रहावे या दृष्टीने जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचे वार्षिक क्रीडा स्पर्धांना शनिवार दिनांक ४ जानेवारी रोजी प्रारंभ झाला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांच्या हस्ते संभाजी राजे नाट्यगृहा जवळील निलांबरी मैदान येथे क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर.डी लोखंडे , जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती स्नेहा पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, शिक्षण अधिकारी प्राथमिक विकास पाटील, शिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीमती चव्हाण, पाणीपुरवठा विभागाचे प्रकल्प अभियंता गणेश भोगावडे यांच्यासह जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांच्या हस्ते फलंदाजी करून या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन झाले. यावेळी श्री अंकित यांनी खेळाडू असल्याची चूनु क दाखवली.
जळगाव जिल्हा परिषदेतर्फे 4 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात क्रिकेट, बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ, रस्सीखेच, रनिंग यासह विविध क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.
शनिवार दिनांक ४ जानेवारी रोजी निलांबरी मैदान येथे क्रिकेट, रनिंग व रस्सिखेच या स्पर्धा खेळवल्या गेल्या. तर ओवा वाचनालयाच्या बॅडमिंटन हॉल येथे बॅडमिंटनच्या स्पर्धा पार पडल्या. जिल्हा परिषदेच्या साने गुरुजी सभागृहात कॅरम व बुद्धिबळ स्पर्धा खेळवण्यात आल्या. 4 जानेवारी रोजी प्राथमिक फेरी तसेच सेमी फायनल व फायनल पर्यंत पोहोचलेल्या स्पर्धांची अंतिम चाचणी दिनांक 11 व 12 जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेतर्फे आयोजित या क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील सर्वच विभागांच्या अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.