जळगाव —९प्रतिनिधि)- वारंवार पोट दुखत असल्याने ४९ वर्षीय महिला रुग्णालयात आली. डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्यानंतर त्यांच्या पोटात मांसाचा गोळा (ओव्हेरियन ट्युमर) असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. सुमारे दीड तास शस्त्रक्रिया चालली. गोळा तब्बल बारा किलो वजनाचा असल्याचेही स्पष्ट झाले. मोफत योजनेचा लाभ मिळवून देत शस्त्रक्रियेने गोळा काढल्यानंतर रुग्ण महिलेने सुटकेचा निःश्वास टाकला.डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कर्करोग विभागातील डॉ. अतुल भारंबे यांनी रंजना दिपू भिल नाव बदललेले (वय ४९, रा. रेवती ता. बोदवड ) यांच्यावर पोटाची शस्त्रक्रिया करून तब्बल बारा किलो वजनाचा मांसाचा गोळा (ओव्हेरियन ट्युमर) काढून अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. कर्करोग तज्ज्ञ डॉ. अतुल भारंबे व त्यांच्या टीमने शर्थीचे प्रयत्न करून ही शस्त्रक्रिया केली. भिल सध्या सुखरूप आहेत.भिल यांना गेल्या अनेक वर्षांपासून पोटदुखीचा त्रास होत होता. त्या डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आल्या. डॉ.भारंबे यांनी रंजना भिल यांची सोनोग्राफी, सिटीस्कॅन यासह आवश्यक त्या तपासण्या केल्या. मोठी गाठ असल्याचे निदान झाल्याने पोटाच्या शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. त्यानुसार शस्त्रक्रिया करून पोटात तयार झालेला बारा किलोंचा मांसाचा गोळा काढला. यासाठी डॉ. आशिष बावनकर, डॉ. शुभम फावडे, डॉ.जानव्ही मापारी,डॉ. निरंजन शिंदे यांनी साह्य केले. भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. शितल फेगडे , डॉ.स्नेहल कोष्टी, डॉ.प्रितम सोमनाथ यांनी काम पाहिले.
याकडे द्या लक्ष
हार्मोन्सचे प्रमाण कमी-जास्त झाल्याने, विषाणू संसर्गाने व शरीरातील इतर विकारांमुळे बालवयापासून ते वृद्धत्वापर्यंतच्या अवस्थेत महिलांना पोटात गाठी हा आजार होऊ शकतो. अशा गाठी अंडाशय, गर्भाशय व आतड्यात होऊ शकतात. या आजाराने ग्रस्त असलेल्या महिलांना पोटदुखीचा त्रास होतो अथवा काहीच त्रास होत नाही. उलट्या होणे, पोटातील गाठीला पीळ पडल्यास ताप येणे, अतिरक्तस्त्राव आदी त्रासाची लक्षणे दिसतात. अशा गाठींकडे दुर्लक्ष केल्यास कालांतराने या गाठीचे कर्करोगात रूपांतर होऊ शकते. त्याचबरोबर पोटातील गाठ फुटून रक्तस्त्राव होऊन रुग्णाच्या जीवितास धोका होऊ शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले.पोटात गाठ झाल्याचे निदान झाल्यास अथवा तशी लक्षणे आढळल्यास रूग्णांनी दुर्लक्ष न करता योग्य त्या तपासण्या करून वेळेवर उपचार घ्यावेत. तसे केल्यास पुढे होणारे धोके टळू शकतात.- डॉ. अतुल भारंबे