<
मा.आमदार किशोर पाटील यांनी शहरातील बाजार पट्टा येथे जाहीर सभेनंतर बैलगाडी वरून रॅलीद्वारे उमेदवारी केली दाखल !
पाचोरा:- आदिवासी आणि बहुजन समाजात भाजपा-शिवसेना विषयी जातीयवादाचे विष पेरणारे काँग्रेसी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खऱ्या अर्थाने जातीवादी असून त्यांची धर्मनिरपेक्षता ढोंगी आहे. सत्ता संपादन करण्यासाठी भोळ्या आणि गरीब जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत काँग्रेसी नेत्यांनी आदिवासींचा केवळ सत्तेसाठी वापर करून घेतला आहे मात्र भाजप-शिवसेनेच्या राज्यकर्त्यांनी माझ्यासारख्या आदिवासी ऊस तोड कामगाराचा मुलाला राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेले म्हाडाचे अध्यक्षपद दिले आहे .हा खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय असून माझ्यासारख्या आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांना काम करण्याची योग्य संधी दिली आहे.
आदिवासी व बहुजन समाजातील मतदार बांधवांनी आपल्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे असे स्पष्ट प्रतिपादन एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे अध्यक्ष म्हाडा संस्थेचे प्रमुख शिवाजीराव ढवळे यांनी केले. शिवसेनेचे उमेदवार किशोर पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी घेण्यात आलेल्या प्रचार सभेला संबोधित करताना त्यांनी हे विचार मांडले. यावेळी व्यासपीठावर भाजपचे खासदार उमेश पाटील माजी मंत्री अब्दुल सत्तार माजी आ चिमणराव पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ संजीव पाटील उपाध्यक्षा प्रा.अस्मिता पाटील उमेदवार आमदार किशोर पाटील. भाजपा जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील जिप सदस्य मधुकर काटे तालुकाध्यक्ष सुभाष पाटील सोमनाथ पाटील भाजयुमो जिल्हाध्यक्ष अमोल पाटील पंस सभापती बन्सी पाटील शेतकरी सेनेचे अरुण पाटील नगराध्यक्ष संजय गोहिल मुकुंद बिलदिकर ॲड. दिनकर देवरे गणेश पाटील रावसाहेब पाटील संजय पाटील विकास पाटील राजेंद्र पाटील यांचेसह शिवसेना-भाजप आरपीआय महायुतीचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
शिवसेना महायुतीचे उमेदवार आ किशोर पाटील यांनी दुपारी अडीच वाजता पाचोरा विभागाचे प्रांत तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला तत्पूर्वी शहरातील बाजार पट्टा भागातील मारुती मंदिराच्या समोरील पटांगणात सभेचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी बारा वाजता सुरू झालेल्या सभेला संबोधित करताना आमदार किशोर पाटील यांनी विरोधकांचा समाचार घेत त्यांनी केलेल्या विकासकामांची आठवण करून दिली. प्रसंगी बोलताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या विकासात्मक धोरणांचा गौरवोद्गार काढत भविष्यकाळात करणार असलेल्या विकासकामांचा संकल्प सांगितला. यावेळी भाजप खा. उन्मेष पाटील यांनी भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना युतीचा धर्म प्रामाणिक पाळण्याचे आव्हान करून शिवसेनेने लोकसभेच्या काळात केलेल्या मदतीची परतफेड करण्याचे आवाहन यावेळी केले.प्रसंगी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी बोलताना जनतेने हिंदू-मुस्लिम भेद न करता शिवसेना महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन मुस्लिम समाज बांधवांना केले.यासभेत भाजपचे जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे सदाशिव पाटील सुभाष पाटील प्रा अस्मिता पाटील डॉ संजीव पाटील कांतीलाल जैन आरपीआयचे एसटी सावळे शिवसेनेचे गणेश परदेशी यांनी समयोचित बोलताना भाजपा-शिवसेना युतीच्या शासनाने केलेल्या जनकल्याणकारी विकास कामांची माहिती करून मतदारांना साकडे घातले. यावेळी आमदार किशोर पाटील यांची कन्या डॉ सुप्रिया पाटील यांनी उपस्थितांना भावनिक साद घालून मतदानाचे आवाहन केले.जाहीर सभेनंतर आ किशोर पाटील यांनी बैलगाडीवर स्वार होत समर्थकांसह प्रांताधिकारी कार्यालयावर येऊन निवडणुक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला.