कसारा-(प्रतिनिधी) – टच संस्था प्रस्तुत एकलव्य स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित टच बालग्रामच्या मैदानावर दोन दिवशीय ग्रामीण क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कबड्डी, लंगडी, खो-खो असे सांघिक तर संगीतखुर्ची, धावणे, लांबउडी, सुर्यनमस्कार असे वैयक्तिक खेळ घेण्यात आले. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पद्मश्री श्री. उदयजी देशपांडे (सुप्रसिद्ध मल्लखांब पटू) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धावपटू महेश नागवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटनप्रसंगी टच बालग्राम कमिटीचे अध्यक्ष श्री. शैलेंद्र नगरसेठ तसेच रेणूका नगरसेठ, विहीगावचे उपसरपंच दिलीप वारे, करोळचे सरपंच नरेंद्र येले, टच बालग्रामचे सामाजिक कार्यकर्ते अमोल कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या उद्घाटनप्रसंगी प्रास्ताविक करताना कांबळे म्हणाले, टच संस्था ही १९९३-९४ सालापासून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अविरतपणे कार्य करीत आहे टच संस्थेच्या वतीने दरवर्षी ग्रामीण क्रीडा महोत्सवाचे, विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते त्याच अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव मिळावा यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सहा व सात जानेवारीला टच बालग्राम येथे ग्रामीण क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून हे क्रीडा स्पर्धेचे सातवे वर्ष आहे. या दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेत एकूण ५७६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विहीगाव परिसरातील ११ पाडयातील, पालघर मधील २ ठिकाणावरील विद्यार्थी सहभागी झाले होते.
ग्रामीण क्रीडा महोत्सव दोन दिवस चालवण्यात आला. यावेळी पंच म्हणून विविध शाळातील शिक्षकांनी भुमिका पार पाडली. ग्रामीण क्रीडा महोत्सवाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कसारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश गावीत, सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक सुनतकरी, रमेश झाडे, राष्ट्रीय कुस्तीपटू स्नेहा पारिक, बालग्रामचे समिती सदस्य प्रविण बढे स्पर्धा प्रमुख अमोल कांबळे उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गावीत म्हणाले, खेळ आपले आयुष्य घडवत असतात त्यामुळे आपण सर्वानी अशा खेळांचा सातत्याने सराव करत रहावा. त्यानंतर सर्वप्रथम वैयक्तिक खेळातील विजेत्या स्पर्धकांना बक्षीस त्यानंतर सांघिक खेळाचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी सुत्रसंचालन उमाकांत पांचाळ व किरण छेत्री यांनी केले.