जळगाव-(प्रतिनिधी)-केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी काल झालेल्या रेल्वे दुर्घटनेतील जखमींची डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात मध्यरात्री जावून भेट घेत आस्थेने चौकशी केली. त्यांनी जखमींच्या नातेवाईकांना भेटून दिलासा देत, काळजी करू नका, शासनाकडून सर्व प्रकारची मदत केली जात आहे. जखमी लवकरच बरे होतील, असे सांगून त्यांच्याबद्दल सदिच्छा व्यक्त केल्या.
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, गोदावरी फाउंडेशनच्या संचालीका भाजपा प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील, तहसीलदार नीता लबडे, सह-जिल्हा शल्यचिकित्सक आकाश चौधरी, तसेच रूग्णालयाचे अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके,वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत,प्रशासकिय अधिकारी प्रमोद भिरूड,रूग्णालय व्यवस्थापक आशिष भिरूड, डॉक्टर आणि पदाधिकारी उपस्थित होते.काल झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर पाचोरा येथील वृंदावन हॉस्पिटल व विघ्नहर्ता रुग्णालय येथे उपचार करण्यात आले होते. त्यानंतर सर्व नऊ जखमींना डॉ. उल्हास पाटील रूग्णालयामध्ये हलवण्यात आले. जखमींच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेत असल्याचे डॉ. केतकी पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना सांगितले.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही मंत्री महोदयांना रेल्वे दुर्घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी श्रीमती खडसे यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल दुःख व्यक्त करत, मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या.