भडगाव-(प्रतिनिधी )- विद्यापीठाच्या आजीवन अध्यायन व विस्तार विभागाव्दारे शेतकरी, कामगार, महीला, ज्येष्ठ नागरिक अशा विविध घटकांसाठी वेगवेगळे उपक्रम विविध सामाजिक ,सांस्कृतिक संस्थांकडून राबविले जातात त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन कवयित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद तथा सिनेट सदस्य अँड. अमोल पाटील यांनी येथिल जागृती सार्वजनिक वाचनालय आयोजित आर्थिक साक्षरता कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागृती सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष श्री. अतुल परदेशी हे होते.
सदर कार्यशाळा तीन सत्रांमध्ये संपन्न झाली. कार्यशाळेत एकूण 53 व्यक्तींनी सहभाग घेतला होता. आपल्या देशात साक्षरतेचे प्रमाण 76% असुन आर्थिक साक्षरतेचे प्रमाण फक्त 26 %आहे म्हणून या विषयांवर चर्चा होणे आवश्यक आहे. जगातील प्रगत राष्ट्रात आर्थिक साक्षरता जास्त असल्यामुळे तिथे प्रगती देखील होते म्हणून भारत सारख्या विकसनशील राष्ट्रात आर्थिक साक्षरता मोठ्यप्रमाणावर होणे गरजेचे आहे .असे विचार आर्थिक साक्षरता व संकल्पना या विषयांवर बोलतांना प्रा.डॉ.बी.एस.भालेराव यांनी व्यक्त केले.
द्वितीय सत्रात बचत व गुतवणुक करतांना आमिषाला बळी न पडण्याची खबरदारी घ्यावी. बचतीच्या विविध शासकीय योजना व त्यांचा कालावधी तसेच पारंपारिक व अपारंपारिक बचतीच्या योजना व त्याचा लाभ याबाबत प्रा.डॉ. गजानन चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
म्युच्युअल फंड बचतीचा सर्वोत्तम पर्याय असून यामध्ये कमीत कमी रिस्क आहे व यातील गुंतवणुकीवर शासनाचा अंकुश असल्यामुळे यामध्ये फसवणूक किंवा तोटा होण्याची शक्यता नसते. कोणत्याही योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर गुंतवणुकीचा कालावधी हा दिर्घ असला पाहिजे. असे श्री.अतुल देसले यांनी तिसऱ्या सत्रात सांगितले.
कार्यशाळा यशस्वितेसाठी अमोल कासार, स्वराज देसले, मंदार कासार,प्रदीप मासरे ,सौ. सायली निशांदर, सौ. ममता परदेशी यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. दीपक मराठे यांनी तर आभाप्रदर्शन सुनिल कासार यांनी केले.