जळगाव –(प्रतिनिधी)- ला.प्र. विभाग, जळगावने मोठी सापळा कारवाई करत भ्रष्टाचाराविरोधातील आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. सामाजिक वनीकरण विभागातील वन परिक्षेत्र अधिकारी आणि इतर दोन कर्मचारी मिळून शेतकऱ्याकडून 36 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले गेले.

सविस्तर वृत्त असे की,

तक्रारदार हे शेतकरी असून त्यांच्या तसेच त्यांच्या तीन नातेवाईकांच्या शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर बांबू आणि अमृत महोत्सवी फळझाड/फुलपिक लागवडीसाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून लाभ मिळावा यासाठी ४ फाईल्स मंजुरीसाठी दाखल केल्या होत्या.

दि. २३ जुलै रोजी तक्रारदार वन परिक्षेत्र अधिकारी मनोज बबनराव कापूरे (५४) यांना भेटले असता त्यांनी प्रत्येकी १०,०००/- (दहा हजार) असे एकूण ४०,०००/- (चाळीस हजार) रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर ३६,०००/- (छत्तीस हजार) रुपये देण्याचे ठरले.

तक्रारदाराला ही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दिनांक ५ ऑगस्ट रोजी ला.प्र. विभाग, जळगाव कार्यालयात तक्रार नोंदवली.

कारवाई बाबत सविस्तर माहिती तक्रारीनंतर पडताळणी करण्यात आली. आरोपी क्रमांक १ (मनोज कापूरे) व आरोपी क्रमांक २ (निलेश मोतीलाल चांदणे – ४५ वर्षे, लिपीक) यांनी ४ फाईल्स मंजुरीसाठी लाचेची मागणी केल्याचे पंचांसमक्ष स्पष्ट झाले. त्यांनी ३५,०००/- स्वतःसाठी व १,०००/- (एक हजार) आरोपी क्र. २ साठी असे ३६,०००/- (छत्तीस हजार) रुपये घेण्याचे ठरवले.

रक्कम आरोपी क्रमांक ३ कैलास भरत पाटील (२७ वर्षे, कंत्राटी चालक) यांच्याकडे घेण्याचे ठरवले गेले. त्यानुसार, पंचांसमक्ष कैलास पाटील याने लाच स्वीकारताच तीनही आरोपींना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी पारोळा पोलीस स्टेशन, जळगाव येथे आरोपींवर गुन्हा दाखल करून, तसेच, हॅश व्हॅल्यू सुरक्षित करण्यात आली आहे.

सदर कारवाई मा. श्री. भारत तांगडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. योगेश ठाकूर, पोलीस उप अधिक्षक, ला.प्र.वि., जळगांव यांनी केली असून पुढील तपास तपास अधिकारी: श्री. हेमंत नागरे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., जळगांव हे करीत आहे.













