
जळगाव-(प्रतिनिधी) – जिल्ह्यातील लोणवाडी खुर्द (ता. जि. जळगाव) येथील ग्रामसेवक आणि सरपंच हे आपल्या मुख्यालयी वास्तव्यास राहत नसल्याची गंभीर तक्रार थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आली आहे. ॲड. अरुण शिवाजी चव्हाण यांनी ही तक्रार दाखल केली असून, यामुळे ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजात अडथळे येत आहेत आणि नागरिकांना शासकीय सेवा वेळेवर मिळण्यास अडचणी येत आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकानुसार (क्रमांक: पंरास 2018/प्र.क्र.488/आस्था-7, दिनांक 9 सप्टेंबर 2019) ग्रामीण भागातील शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे आवश्यक व बंधनकारक आहे, विशेषत: ग्रामसेवकांना. या नियमाचे ग्रामसेवक व सरपंच पालन करत नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी
ग्रामसेवक व सरपंच मुख्यालयी राहत नसल्यामुळे प्रशासनाविषयी ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. स्थानिक कामकाजात अनियमितता व उशीर होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
तातडीने चौकशी करून कारवाईची मागणी
तक्रारदार ॲड. अरुण शिवाजी चव्हाण यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तातडीने लक्ष देऊन सदर ग्रामसेवक व सरपंच यांच्याविरुद्ध आवश्यक ती चौकशी करून योग्य ती शिस्तभंगाची कारवाई करण्याची विनंती केली आहे.

तक्रारीची एक प्रत माहितीस्तव गट विकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालय, जळगाव यांनाही देण्यात आली आहे. या तक्रारीमुळे लोणवाडी खुर्द ग्रामपंचायतीच्या कारभाराकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून, पुढील कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.










