<
काँग्रेस व एमआयएम च्या उमेदवारांनी घेतला होता आक्षेप
रावेर (प्रतिनिधी) :- येथील तहसीलदार कार्यालयात आज उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली, यावेळी अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्या उमेदवारी अर्जावर कॉग्रेस चे उमेदवार शिरीषदादा चौधरी व एमआयएम चे उमेदवार विवेक ठाकरे यांनी आक्षेप घेत हरकत घेतली होती.
यावेळी दोन्ही उमेदवारांकडून सुमारे पाच तास युक्तीवाद झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या आक्षेपामध्ये अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्या उमेदवारी अर्जावर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पडताळणी करून केलेला आक्षेप निकाली काढला आहे.
विरोधकांनी घेतलेला आक्षेप फेटाळून अनिल चौधरी यांचा उमेदवारी अर्ज मंजूर करण्यात आला आहे, त्यामुळे अनिल चौधरी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अनिल चौधरी(अपक्ष उमेदवार)-विरोधकांनी माझ्या उमेदवारीची धास्ती घेतली आहे. रावेर-यावल मतदारसंघात मतदारांनकडून भर-भरून प्रतिसाद मिळत असल्याने प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या पाया खालून वाळू सरकत आहे म्हणून माझ्या उमेदवारी बद्दल असे बिनबुळाचे हरकत घेतली जात आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पडताळणी करून आरोप निकाली काढला असल्याचे अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी सांगितले.
मा.आ.शिरीषदादा चौधरी(काँग्रेस पक्षाचे उमेदवार) –
उमेदवारी अर्जात अपूर्ण माहिती सादर केल्याने आक्षेप घेण्यात आला होता.
विवेक ठाकरे(एमआयएम पक्षाचे उमेदवार) –
प्रतींज्ञापत्रात नमूद केलेल्या माहितीबाबत आक्षेप घेण्यात आला होता. त्याबात दोन वेळा सुनावणी घेण्यात आली होती. निवडणूक अधिकारी यांनी त्यांचा अर्ज मंजूर केला आहे. तो प्रश्न आता जरी सुटला असेल, तरी त्याबाबत वरिष्ठ प्राधिकरणाकडे याचिका दाखल करणार आहे.