Saturday, August 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अक्षरदीप बहिणाई

Desk Team by Desk Team
22/08/2026
in विशेष
Reading Time: 1 min read
अक्षरदीप बहिणाई

अशोक चौधरी
समन्वयक, बहिणाबाई चौधरी मेमो. ट्रस्ट
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव घेतले की आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते ती कान्हदेशाच्या काळ्या मातीशी नाते सांगणारी, कष्टाच्या संसारात जगलेली आणि निसर्गाच्या कुशीतून जीवनाचे गूढ उलगडून सांगणारी एक साधी, निरक्षर स्त्री. औपचारिक शिक्षणाचा स्पर्शही ज्यांच्या आयुष्याला झाला नाही, त्या बहिणाबाईंना मानवी जीवनाकडे बघण्याचे एक स्पष्ट आणि प्रभावी तत्त्वज्ञान त्यांच्याजवळ होते. एखाद्या बुध्दिमान तत्वज्ञान्याची किंवा महाकवीची जणू काही प्रतिभाच त्यांना प्राप्त झालेली होती. म्हणूनच त्यांच्या काव्याचा सर्व अविष्कार सुभाषितांचा आहे. मराठी वाड्मयात अमर होतील अशी अनेक सुभाषिते जागोजाग त्यांच्या काव्यात विखुरलेली आढळतील. जसे- ज्यातून हरिनाम निघत नाही त्याला तोंड म्हनू नये. बिना कपाशीने उले त्याले बोंड म्हनू नये.
प्रतिभा हे कवीला निसर्गाचे देणे आहे. ते त्याच्याबरोबरच यावे लागते. यत्नाचा किंवा विद्येचा त्याच्याशी काही संबंध नाही. तसे जातीच्या कवीचे आहे त्याचे ह्दयाचं ताल धरून बसलेले असते. सृष्टीतले सौंदर्य तेवढे त्याच्या डोळ्याला दिसते आणि जीवनातले संगीत त्याला ऐकू येते. एकदा राजसआत्याने बहिणाईला विचारले, तुला एवढे हे शिकवतो कोण? माझ्यासारखीच तू ना शिकलेली, ना पढलेली. तुला ही गाणी सुचतात तरी कशी? ही बोली कोण शिकवतो? त्या प्रसंगाला त्यांनी दिलेले हे उत्तर..
‘माह्यी माय सरोसती,
माले शिकवते बोली,
लेक बहिनाच्या मनी,
किती गुपितं कोरली…’
सरस्वतीला त्या ‘देवी’ म्हणून दूर ठेवत नाहीत; त्या तिला ‘माय’ म्हणतात. कारण त्यांच्यासाठी ज्ञान हे उपासनेच्या चौकटीत बंदिस्त नसून जगण्याच्या अनुभवातून मिळणारे होते. माय जशी लेकराला बोलायला शिकवते, तशीच सरस्वती त्यांच्या मनातल्या गुपितांना शब्द देत होती. अक्षर ओळखता न आलेल्या या स्त्रीच्या अंतःकरणात शब्दांचे एवढे विश्व कोणी निर्माण केले? या प्रश्नाचे उत्तर बहिणाबाई स्वतःच देतात ‘माह्यी माय सरसोती.’
बहिणाबाईंची ही प्रतिभा निसर्गाशी एकरूप झालेली होती. पावसात त्यांना सृष्टीचे तत्त्वज्ञान दिसते, मातीत जीवनाचे बीज दिसते, सूर्याच्या प्रकाशात आशेचा किरण दिसतो, वाऱ्याच्या झुळुकीत ईश्वराचा स्पर्श जाणवतो आणि पानांच्या सळसळीत देवाचा पायरव ऐकू येतो. त्यांच्या दृष्टीने गीता, भागवत, पोथ्या-पुराणे यांचे महत्त्व नाकारण्यापेक्षा त्यातील तत्त्वज्ञान आचरणात आणणे अधिक महत्त्वाचे आहे. म्हणूनच त्या म्हणतात..
‘माह्यासाठी पांडुरंगा,
तुह्यं गीता भागवत,
पावसात समावतं,
माटीमधी उगवते.’
हा विचार किती मोठा आहे! देवाचा शोध घेण्यासाठी दूर जाण्याची गरज नाही. तो पावसाच्या थेंबात आहे, मातीत आहे, उगवणाऱ्या पिकात आहे, श्रम करणाऱ्या शेतकऱ्याच्या घामात आहे. कर्मातून ईश्वराचा साक्षात्कार घेण्याची ही बहिणाबाईंची जीवनदृष्टी आहे. म्हणूनच बहिणाबाईंच्या कवितेत शेती ही केवळ उपजीविकेचे साधन राहत नाही; ती जीवनाची शाळा बनते. माती त्यांची गुरू होते. पाऊस त्यांचा ग्रंथ होतो. निसर्ग त्यांचा शिक्षक होतो. आणि अनुभव हा त्यांचा विद्यापीठाचा अभ्यासक्रम बनतो.
बहिणाबाईंच्या व्यक्तिमत्त्वातील एक अत्यंत महत्त्वाचा पैलू अनेकदा दुर्लक्षित राहतो त्यांना शिक्षणाचे महत्त्व मनापासून जाणवले होते. स्वतःच्या आयुष्यात अक्षरज्ञानाची उणीव त्यांनी अनुभवली होती. म्हणूनच आपल्या मुलांनी शिकावे, पुढे जावे, मोठे व्हावे, ज्ञान मिळवावे, ही त्यांची मनापासूनची इच्छा होती. त्यांचा मुलगा सोपानदेव पुढे उत्तम शिक्षण घेऊन शिक्षक बनतो, साहित्यविश्वात नाव कमावतो, ही घटना बहिणाबाईंच्या मातृत्वाच्या आणि शिक्षणा- विषयीच्या आस्थेची जिवंत साक्ष आहे. ज्यांच्या हातात स्वतः लेखणी नव्हती, त्यांनी आपल्या मुलाच्या हातात लेखणी दिली. ज्यांना अक्षरांची ओळख नव्हती, त्यांनी आपल्या लेकराच्या आयुष्यात अक्षरांचे विश्व उभे राहावे अशी इच्छा केली. हीच बहिणाबाईंच्या जीवनातील सर्वांत मोठी शैक्षणिक जाणीव म्हणावी लागेल. बहिणाबाईंचा नातू पांडुरंग (ओंकार यांचा मुलगा) यांनी सांगितलेली आठवण त्याची साक्ष आहे. त्याला त्या नेहमी म्हणत असत, ‘तू ही शिक आणि माह्या सोपान्यासारखा मोठा हो’. त्यांच्या शिक्षणासाठी त्या नेहमी आग्रही असत. प्रसंगी कठोरही होत असत. समाजातील प्रत्येक मुलाने शिकावे, ज्ञानाच्या प्रकाशाने आपले जीवन उजळावे, अशी त्यांची अंतःकरणापासूनची भूमिका होती. त्यामुळे बहिणाबाईंच्या कवितेत केवळ निसर्ग, शेती, संसार आणि अध्यात्म नाही; तर अनुभवातून आलेली ज्ञानाची आसही आहे. त्यांच्या याविषयीच्या म्हणी याची साक्ष देतात “मस्तकातलं पुस्तकात गेलं, पुस्तकातलं मस्तकात आलं”, अरे छापीसनी आलं, मानसाले समजलं। छपीसनी जे राह्यालं, देयालेच उमजलं।। मानसापरी मानूस, राहतो रे येडजाना। अरे होतो छापीसनी, कोरा कागद शहाना।। अऱे असोद्याची शाया, पोऱ्हं शंबर शंबर।
शायामधी भारी शाया, तिचा पह्यला नंबर।।, इमानानं शिकाळती, तठी आबा मायबाप। देती अवघ्याले इद्या, भरीभरीसनी माप!।। (शिक्षक- आबा-कवी बा.सी. मर्ढेकर यांचे वडील)
बहिणाबाईं या साध्या, सरळ ग्रामीण स्त्री होत्या, पण त्यांचे विचार वैश्विक होते; त्या मातीशी जोडलेल्या होत्या, पण त्यांच्या प्रतिभेने आकाशाला गवसणी घातली. त्यांच्या कवितेतला ‘पांडुरंग’ देवळाच्या गाभाऱ्यात जितका आहे, तितकाच तो शेताच्या बांधावर आहे. सरस्वती पुस्तकात जितकी आहे, तितकीच ती बहिणाबाईंच्या मनात आहे. ज्ञान शाळेत जितके मिळते, तितकेच ते जीवनाच्या अनुभवातूनही मिळते ही जाणीव त्यांच्या संपूर्ण कवितेतून व्यक्त होते. म्हणूनच आजच्या शिक्षणाच्या युगात बहिणाबाई अधिक महत्त्वाच्या वाटतात. कारण त्यांनी आपल्याला दोन गोष्टी एकाच वेळी शिकवल्या. शिका आणि जगायलाही शिका. अक्षरज्ञान मिळवा; पण त्या अक्षरातून जीवनाचे ज्ञान मिळवा.
आज त्यांच्या जयंतीनिमित्त बहिणाबाईंना अभिवादन करताना एक गोष्ट विशेषत्वाने लक्षात घ्यायला हवी ज्यांना स्वतः अक्षरांचा प्रकाश मिळाला नाही, त्यांनी पुढच्या पिढीसाठी ज्ञानाचा दीप तेवत ठेवला. त्या दीपाची ज्योत म्हणजेच अक्षरदीप बहिणाई!

Desk Team

Previous Post

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अक्षरदीप बहिणाई

अक्षरदीप बहिणाई

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo