<
जळगाव – आपली लोकशाही अधिक बळकट होण्यासाठी विधानसभा निवडणूकीत अधिकाधिक मतदारांनी सहभागी होण्यासाठी स्वीप उपक्रमाअंतर्गत नाविन्यपुर्ण उपक्रम राबवुन मतदान जनजागृती करावी असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले. जिल्ह्यात मतदान जनजागृतीबाबत स्वीप समिती सदस्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज झाली त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीत जिल्ह्यात मतदान जनजागृतीसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमांबाबत चर्चा करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी यांनी उपस्थित सदस्यांकडून नियोजन व संकल्पना याबाबत चर्चा केली.
डॉ.अविनाश ढाकणे म्हणाले जिल्ह्यातील प्रत्येक मतदारापर्यत मतदानाचा संदेश पोहचविण्यासाठी व मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ होण्यासाठी सर्वांनी कल्पक उपक्रम राबवा. प्रत्येक विभाग, शाळा, महाविद्यालय, अशासकीय संस्था (एन.जी.ओ.) यांनी मतदान जनजागृती कार्यक्रमात योगदान देणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील मागील निवडणूकीची मतदानाची टक्केवारी पाहता शहरी भागातील मतदारसंघात मतदान कमी होत असल्याने त्यासाठी विविध उपक्रम राबवून गतवेळी कमी मतदान झालेल्या भागावर विशेष लक्ष केंद्रीत करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
जिल्ह्यातील रेल्वे स्थानक, बसस्टँड आदी वर्दळीच्या ठिकाणी तसेच सर्व बाजारपेठ, बँक, मॉल्स, सिनेमागृह यांच्या दर्शनी भागात मतदान जनजागृती बाबत बॅनर्स लावावीत. मतदानाच्या दिवसापुर्वी सर्व मतदारांना मतदार चिठ्ठी पोहोच करण्यात यावी. महिला मतदारांनी मतदानात सहभागी होण्यासाठी अशासकीय संस्थांनी प्रयत्न करावेत. मतदानाच्या दिवशी वयोवृध्द, ज्येष्ठ नागरीक व दिव्यांग व्यक्ती यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याबाबत देखील यावेळी सूचित करण्यात आले. प्रत्येक नागरीकांनी मतदानाचा हक्क स्वयंस्फुर्तने बजावावा तसेच इतरांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी प्रोत्साहीत करावे असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
या बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम एस. लोही, सहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्था बी.बी.पाटील, सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत बिरार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण आर.आर. तडवी, स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील तसेच तालुका स्वीप नोडल अधिकारी व इतर विभागाचे अधिकारी तसेच अशासकीय संस्थांचे प्रमुख उपस्थित होते.