<
पाळधी/जळगांव(प्रतिनीधी)- मानवाची निर्मिती ही ईश्वराची सर्वात श्रेष्ठ कलाकृती. मानवाचे जीवन म्हणजे ईश्वराची देणगी आहे. मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक नवनवीन प्रयोग करत आपले जीवन निरोगी व सुखकर करण्याचा प्रयास चालवला आहे. असे असुनही मानवाला आजतागायत रक्ताला पर्याय शोधता आला नाही. एका मानवाचेच रक्त दुसर्या गरजु मानवाला चालते.असे या कार्यक्रमा वेळी शाळेच्या अध्यक्षा सौ.अर्चना सुर्यवंशी बोलत होत्या. दिनांक १४ सोमवार रोजी नोबल इंटरनॅशनल स्कूल पाळधी येथे सुर्या फाऊंडेशन तर्फे पाळधीचे प्रसिद्ध उद्योगपती मा. शरदकाकाजी कासट यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची वहितुला करण्यात आली. व सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता सरस्वती यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून शाळेच्या अध्यक्षा सौ अर्चना सुर्यवंशी व प्रशांत सूर्यवंशी, शाळेचे आश्रयदाते भगवान सुर्यवंशी यांनी मा.शरदचंद्रजी कासट यांचे औक्षण करून त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू दिली आणि केक कापण्यात आला. यानंतर गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना वह्या वाटण्यासाठी त्यांचा वहितुला करण्यात आला, ज्यातून गरिब-होतकरु मुलांना वह्या वाटप करण्यात आल्या. यासह नोबल इंटरनॅशनल स्कूल पाळधी व जळगाव वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आले होते. ज्यात डॉ. उमेश कोल्हे, निलेश पवार, संदिप सावळे यांनी शाळेच्या वतीने केलेल्या आवाहनातून जमलेल्यांतर्फे स्वेच्छा रक्तदानाच्या माध्यमातून ४०बाटल्या रक्ताचे संकलन केले. विशेष म्हणजे शाळेच्या अध्यक्षा सौ अर्चना सुर्यवंशी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महिला पालक वर्गानेही मोठ्या उत्साहाने रक्तदान केले. या कार्यक्रमाला मा. नरेश खंडेलवाल यांचे विशेष योगदान लाभले. यावेळी सुरज झंवर, अनिलजी कासट, जेष्ठ शिक्षक आधार गुरुजी, सुनिल चौधरी, गोपाल सोनवणे, विजय झंवर, पाळधी खु. चे सरपंच चंदुभाऊ माळी, पाळधी बु. चे सरपंच प्रकाश नाना पाटील, पाळधी पो.स्टे.चे सहाय्यक पो. नि. गायकवाड साहेब, शाळेच्या अध्यक्षा सौ अर्चना सुर्यवंशी व प्रशांत सूर्यवंशी, शाळेचे मुख्याध्यापक योगेश करंदीकर, उज्ज्वला झंवर यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.