<
शहरातील मार्केट, हॉस्पिटल्स, मंगल कार्यालयांची पार्किंग गेली कुठे?
शहरातील वाढत्या लोकसंख्येबरोबरच येथील वाहनांची संख्याही वाढत आहे; परंतु त्या प्रमाणात वाहन पार्किंगची सुविधा नसल्याने शहरात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पार्किंग अभावी वाटेल तेथे वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीचे नियोजन बिघडले आहे, त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शहरातील मुख्य रस्त्यासह वसाहती अंतर्गत रस्त्यांवर दुतर्फा वाहने पार्क केली जात आहेत. दोन्ही बाजूला बेकायदा पार्किंग दिसून येते. या बेशिस्त पार्किंगमुळे शहरातील वाहतूक नियोजन ढासळले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर वाहने उभी केली जात असल्याने पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. तसेच रस्त्यांच्या कडेला ट्रक, कंटेनर व शाळेच्या बस उभ्या केलेल्या दिसून येतात. त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याचं नागरिकांचे म्हणणे आहे. शहरातील गाड्या पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून यावर तोडगा न काढल्यास शहरातील पार्किंग समस्या गंभीरच नव्हे तर आटोक्यापलीकडे जाण्याची शक्यता आहे. जळगांव शहर महानगरपालिकेला यावर गांभीर्यांने विचार करण्याची गरज आहे. शहरातील सर्व प्रमुख रस्ते दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगने व्यापलेले असतात. सकाळी ९ वाजल्यापासून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत रस्ते वाहनांच्या पार्किंगने भरलेले असतात. शहरात दिवसाकाठी हजारो वाहने येतात. त्याचबरोबर भाड्याने माल वाहतूक करण्याऱ्या टेम्पो, ट्रक, रिक्षा, प्रवासी रिक्षा, मोटरसायकल यांची संख्याही बरीच मोठी असते. त्यामुळे दिवसभर शहरातील सर्व प्रमुख रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची गर्दी दिसून येते. एवढेच नव्हे तर डबल पार्किंग व अस्ताव्यस्थ पार्किंगही केले जाते. वाहन पार्किंगसाठी जागाच नसल्याने वाट्टेल तशी वाहने पार्क केली जातात.
पार्किंगसाठी नियोजन नाही
शहरात अनेक नव्या इमारतींची उभारणी करण्यात आली. मात्र, या इमारती बांधताना पार्किंगची व्यवस्था केली गेली नाही. काही ठराविक इमारतीमध्येच अंडग्राऊंड पार्किंगची सोय आहे. शहरातील बहुतेक मार्केट, हॉटेल, मंगल कार्यालयाची पार्किंग हे रस्त्यावरच आहे. त्यामुळे रस्त्यावरील पार्किंगवर ताण येत आहे.पावसाळ्यात तर मार्केट परिसरात सततची वाहतूक कोंडी असते.
उपाययोजना न केल्यास परिणाम गंभीर
शहरातील पार्किंग समस्या प्रचंड गंभीर बनली आहे. पार्किंगच्या समस्येकडे कोणीही गांभीर्याने पहात नाही. त्याचबरोबर मनपाकडूनही फार मोठे प्रयत्न होत नाहीत. जळगांव शहराला पार्किंगच्या समस्येतून मुक्ती देण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न होत नाही. पार्किंगच्या समस्येचा विषय प्रचंड गंभीर आहे. पण तेवढ्या गम्बीर्याने हा विषय हाताळला जात नाही. यावर योग्य पद्धतीने विचार करून नियोजन न केल्यास पुढील चार, पाच वर्षात जळगांव शहराची स्थिती गंभीर बनेल.
शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने अनेक योजना महापालिकेतर्फे राबविल्या जात असताना दुसरीकडे मात्र शहराचा वाढता व्याप बघता अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. शहरात पार्किंगची समस्या मोठय़ा प्रमाणात आहे. बाजारपेठा, रुग्णालये, मंगल कार्यालये किंवा हॉटेलमध्ये गेल्यानंतर वाहने कुठे ठेवायची? ही सर्वात मोठी समस्या नागरिकांसमोर उभी ठाकली असून त्यात सुधारणा करण्यासाठी महापालिका हतबल झाल्याचं दिसून येत आहे.तसेच शहरात आणि शहराबाहेर गल्लीबोळात आज मोठय़ा प्रमाणात विवाह समारंभासाठी मंगल कार्यालये बांधण्यात आली आहेत. या मंगल कार्यालय परिसरात कुठल्याच सोयी सुविधा नाहीत. मात्र, भाडे अमाप आकारले जात आहे. तसेच मंगल कार्यालयासमोर पार्किंगची व्यवस्था नसल्याने त्यामुळे विवाह समारंभाला आलेले लोक कुठल्या तरी दुकानासमोर किंवा रस्त्यावर वाहने लावतात. शिवाय या सर्व ठिकाणी फेरीवाले आणि छोटे दुकानदार दुकाने थाटून बसतात त्यामुळे पार्किंगला जागा राहत नाही. अशा परिस्थितीत वाहतूक पोलीस अशा अनधिकृत पार्किंगच्या ठिकाणी गाड्या ठेवल्यामुळे त्या घेऊन जात असतात आणि नागरिकांना मानसिक त्रासासोबत आर्थिक भुर्दंड बसतो. शहरात मंगल कार्यालये, हॉटेल्स, रुग्णालयांची वाढती संख्या आणि रस्त्यावरील बेशिस्त वाहतूक आणि अतिक्रमणांमुळे जळगांव शहरात फिरता येण्याजोगी स्थिती राहिलेली नाही. यात सुधारणा होण्याची शक्यता नाही. अधूनमधून थोडीफार शिस्त आणण्याचा प्रयत्न होतो, परंतु ती कारवाई थातुर-मातूर असते. डायऱ्या भरतात, दंड होतो. पुन्हा बेकायदा वाहतूक करण्यास मोकळे! जळगांव शहर सर्व दिशांनी वाढू लागले आहे. बाजारपेठाही पसरत आहेत. त्यामुळे वाहनांची वर्दळ वाढते आहे. त्यात प्रामुख्याने मोटार सायकल, ऑटो रिक्षा, बस, तसेच मोठ्या गाड्यांचा समावेश आहे. प्रवाशांना दमबाजी, लुटण्याचा प्रकारही शहरात होतो. तसेच बाजारपेठेत ऑटो रिक्षा आणि मोटार सायकल आडव्या-तिडव्या लावलेल्या असतात. बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचाही सुळसुळाट वाढला आहे. फुले मार्केट आणि गोलाणी मार्केट, बाजार समितीमध्ये शेतीमाल घेऊन येणाऱ्या ट्रक रस्त्यावर फेरीवाल्यांमुळे नेहमीच वाहतुकीची कोंडी झालेली असते. हा प्रश्न कधी सुटणार हे कोणालाच माहीत नाही! बेशिस्त वाहतुकीबरोबरच मुख्य रस्त्याने कंटनेर, क्रेन यासारखी अवजड वाहने दिवस-रात्र पळत असतात. या वाहनांमुळे कितीतरी अपघात झाले आहेत. अनेकांचे प्राण गेले आहेत. बहुतांश ठिकाणी दुकानदारांनी रस्त्यावर लावलेले सामान, हातगाड्या, फळविक्रेते यांचा गराडा असतो. अतिक्रमण हटविण्याची कारवाई रोज शहराच्या वेगवेगळ्या भागात सुरू असली तरी ती परिणामकारक ठरली नाही.