<
मुंबई(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक खाद्यपदार्थ विक्रेत्याची नोंदणी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे झाली पाहिजे. यासाठी विभागाने विशेष मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी दिले.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कामकाजाची आढावा बैठक श्री. येरावार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पार पडली. यावेळी अन्न व औषध प्रशासन आयुक्त पल्लवी दराडे यांच्यासह विभागाचे अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त,जिल्ह्यांचे सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.
मार्वल स्टूडियो सोलापुर
अन्नपदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष देणे गरजेचे आहे, असे सांगून श्री. येरावार म्हणाले, यासाठी रस्त्यावर अन्नपदार्थ विकणाऱ्या छोट्या विक्रेत्यांपासून ते मोठ्या दुकानदारांपर्यंत प्रत्येकाची नोंदणी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे झाली पाहिजे. राज्यात मोठ्या प्रमाणात केटरिंग व्यवसाय चालक आहेत. त्यांची नोंदणी तात्काळ हाती घ्यावी. रस्त्यावरील गाड्यांवर बनविल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांची गुणवत्ता चांगली राखण्याच्या दृष्टीने तेथील विक्रेत्यांना प्रशिक्षण व अन्य सुविधा एकत्रितरित्या पुरविण्यासाठी ‘हायजिनिक फूड हब’ ही नवीन संकल्पना राबविण्यास सुरुवात केली. मुंबईत गिरगाव चौपाटी व जुहू चौपाटी येथे असे हब स्थापन करण्यात आले असून, राज्यभरात ‘हायजिनिक फूड हब’ स्थापन करावेत.
यावेळी श्री. येरावार यांनी विविध सूचना केल्या. औषध कंपन्या तसेच अन्न प्रक्रिया उद्योगांना त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर फंड) मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत देण्यासाठी आवाहन करावे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे काम अधिक कार्यक्षमरित्या होण्यासाठी एक कालबद्ध लक्ष्य निर्धारित करणे गरजेचे असून, त्यासाठी विभागाने व्हिजन डॉक्युमेंट तयार करावे. विभागाच्या सर्व जिल्हास्तरीय कार्यालयासाठी शासकीय इमारती बांधण्याच्या कामाला गती द्यावी. सर्व इमारतींचा आदर्श आराखडा तयार करावा. विभागातील रिक्त पदे लवकर भरण्याच्या दृष्टीकोनातून पदांचा आकृतीबंध, भरतीसाठी बिंदूनामावली तयार करावी. अवैध गुटखा विक्रीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी, आदी सूचना यावेळी करण्यात आल्या.