<
मतमोजणीसाठी 1254 अधिकारी, कर्मचारी कार्यरत राहणार
जळगाव शहर मतदार संघाची मतमोजणी 26 फेऱ्यांमध्ये तर एरंडोलची 21 फेऱ्यांमध्ये पूर्ण होणार
जळगाव, दि. 22 – महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील अकरा विधानसभा क्षेत्रात सरासरी 60.90 टक्के इतके मतदान झाले असून मतमोजणी येत्या 24 ऑक्टोबर रोजी संबंधित तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली असून याकरीता 1254 अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक केली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. जिल्ह्यात विधानसभेचे अकरा मतदार संघ असून या मतदार संघाची मतमोजणी 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.00 वाजता संबंधित मतदार संघाचे निवडणूक निरिक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, स्क्षूम निरिक्षक यांच्या उपस्थितीत होणार आहे. प्रत्येक मतदार संघाची मतमोजणी त्या त्याठिकाणी एकाचवेळी 14 टेबलवर सुरु करण्यात येणार आहे. एकावेळी 14 मतदान केंद्राची मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठी जिल्ह्यात 176 मतमोजणी सुपरवायझर, 176 मतमोजणी सहायक, 33 रो अधिकारी, 44 सुविधा कर्मचारी, 88 टॅबुलेशन कर्मचारी, 11 मिडीया को ऑडिनेशन, 55 पोस्टल मतमोजणी सुपरवायझर, 55 पोस्टल मतमोजणी सहायक, 220 स्क्षुम निरिक्षक व इतर कर्मचारी कार्यरत राहणार आहे. प्रत्येक मतदार संघासाठी एक मतमोजणी निरीक्षक, त्यांच्या अधिनस्त सूक्ष्म निरीक्षकही मतमोजणीवर लक्ष ठेवून असणार आहे. सकाळी 8 वा सर्वप्रथम पोस्टल मतमोजणीने सुरवात होणार असून त्यानंतर मतदान केंद्रनिहाय ईव्हीएमची मतमोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर एका निश्चित केलेल्या टेबलवर रँडमली निवड केलेल्या पाच व्हीव्हीपॅटमधील चिठ्यांचीही मतमोजणी करण्यात येणार आहे. याकरीता 10 टक्के कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, सहायक, सूक्ष्म निरीक्षक, शिपाई याप्रमाणे कर्मचारी असणार आहे.
विधानसभा क्षेत्रनिहाय मतमोजणी होणार असलेल्या फेऱ्या- चोपडा विधानसभा मतदार संघ 23 फेऱ्या, रावेर 22 फेऱ्या, भुसावळ 22 फेऱ्या, जळगाव शहर 26 फेऱ्या, जळगाव ग्रामीण 23 फेऱ्या, अमळनेर 23 फेऱ्या, एरंडोल 21 फेऱ्या, चाळीसगाव 24 फेऱ्या, पाचोरा 23 फेऱ्या, जामनेर 23 फेऱ्या, मुक्ताईनगर 23 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होणार आहे.
विधानसभा क्षेत्रनिहाय मतमोजणी होणार असलेली ठिकाणे – चोपडा- महाराष्ट्र वखार महामंडळ, गोडवून क्रमांक 2, चोपडा, रावेर – नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, रावेर, भुसावळ- प्रशासकीय इमार, प्रभाकर हॉलसमोर, भुसावळ, जळगाव शहर- महाराष्ट्र वखार महामंडळाचे गोडवून क्रमांक 26, जळगाव, जळगाव ग्रामीण- महाराष्ट्र वखार महामंडळ, गोडवून क्रमांक 2, धरणगाव, अमळनेर- छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, प्रताप कॉलेज, अमळनेर, एरंडोल- डीडीएसपी कॉलेज, तरणतलावाजवळ, म्हसावद रोड, एरंडोल, चाळीसगाव- वायएन चव्हाण महाविद्यालय, हिरापूर रोड, चाळीसगाव, पाचोरा-गिरणाई क्रेडिट सोसायटी गोडावून क्रमांक 3, मोंढाळा रोड, पाचोरा, जामनेर- शासकीय खाद्यनिगम गोडवून क्रमांक 3, मार्केट कमिटीच्या पश्चिम बाजूला, जामनेर, मुक्ताईनगर-श्री संत मुक्ताबाई महाविद्यालय इनडोअर स्टेडियम, मुक्ताईनगर येथे होणार आहे.
मतमोजणीसाठी नेमण्यात आलेल्या पर्यवेक्षक व सहाय्यक यांचे पहिले प्रशिक्षण पूर्ण झाले असून दुसरे प्रशिक्षण आज (23 ऑक्टोबर) होणार आहे. प्रशिक्षणानंतर मतमोजणीसाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी यांची सरमिसळ करुन कोणाला कोणत्या मतदार संघात मतमोजणीसाठी पाठविण्याचे याचे आदेश संबंधितांना देवून त्यांना लगेचच मतमोजणी केंद्राकडे रवाना करण्यात येणार असल्याची माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिली आहे. मतमोजणी सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी सर्व मतदानकेंद्राच्या परिसरात पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.