<
पाळधी/जळगांव(प्रतिनीधी)- आज नोबल इंटरनॅशनल स्कूल पाळधी येथे पारंपारिक पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली. यात दिवाळी म्हणजे फक्त फटाके नाही. हे समजण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी दिवाळीच्या दिवसाचे विविध रुपे जसे की, वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज याची प्रतीके बनवून विद्यार्थ्यांना यावर मार्गदर्शन केले. दिवाळी सण एकत्र येऊन नातेसंबंध वाढवण्याचा सण आहे, कोणतेही वायूप्रदूषण किंवा ध्वनीप्रदूषण करण्याचा सण नाही आहे. आपण फटाके फोडून स्वत: आनंद व्यक्त करू शकतो पण तोच दुसऱ्या व्यक्तीचा, पक्षांचा, लहान बाळांचा, जेष्ठ नागरिकांचा, आजारी माणसांचा आनंद हिरावून घेतो. देवाने आपण सर्व एकत्र यावे, यासाठी या सणाची निर्मिती केली आहे. पण असे फाटके फोडून जर आपण दुसऱ्यांच्या जीवाशी खेळलो, तर त्याला देखील नक्कीच वाईट वाटेल. असे शाळेच्या अध्यक्षा सौ अर्चना सुर्यवंशी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले. यावेळी इयत्ता नर्सरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेचे रुपांतर एका रंगमहाल प्रमाणे केले होते. शाळेचे कला शिक्षक गुणवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वतः विविध प्रकारच्या कागदांचे व टाकाऊ वस्तूंपासून पर्यावरण पुरक आकाश कंदील तयार करून आकाश कंदीलांची विविध रुपे साकारली होती. ज्यातून संपुर्ण शाळेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी शाळेच्या अध्यक्षा सौ अर्चना सुर्यवंशी व श्री. प्रशांत सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना फटाकेमुक्त दिवाळीची शपथ देऊन विद्यार्थ्यांना मिठाई वाटप केली. शाळेचे मुख्याध्यापक योगेश करंदीकर यांनी दिवाळीच्या पाच वेगवेगळ्या दिवसांची प्रतिकृती बनविलेल्या शिक्षक यात वसुबारस- सुवर्णा चौधरी, धनत्रयोदशी- सुवर्णा पवार, लक्ष्मीपुजन- सपना पाटील, बलिप्रतिपदा- राधिका उपाध्याय, भाऊबीज- पायल सोमाणी या सर्व शिक्षकांचे कौतुक केले. यावेळी उज्वला झंवर, गुणवंत पवार, सतिश पाटील यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांसह गावातील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले.