<
शेतकर्यांच्या डोळ्यात ऐन दिवाळीत निघाले अश्रू
वावडदा/जळगांव(प्रतिनीधी)- जळगांव तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी चिंतातूर झाले आहेत मात्र प्रशासन उदासीन असून अद्याप नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. गेल्या आठवड्या पासून पावसाची संततधार सुरू आहे. अतिवृष्टीमुळे वावडदा, म्हसावद, बोरनार, जळके, विटनेर, पाथरी, आदी गावात मका, कापुस, ज्वारी सह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. नुकसानीची तीव्रता एवढी प्रचंड आहे की, मक्याच्या कणसाला कोंब फुटले आहेत तसेच मक्याचे दाणे गळून पडले आहेत. कापूस वेचणीवर आल्यामुळे शेतकऱ्यांचे खुप नुकसान झाले आहे. ज्वारीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. पिके काढणीवर आलेले असताना आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पिकांसाठी खर्च केलेले पैसेही शेतकऱ्यांना मिळणार नाहीत एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.