<
न्यायमूर्ती शरद बोबडे हे लवकरच सरन्यायाधीशपदी विराजमान होणार आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी शरद बोबडे यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानंतर आता न्यायमूर्ती बोबडे यांच्या नियुक्तीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. न्यायमूर्ती शरद बोबडे हे सरन्यायाधीशपदी विराजमान होणार असून ते १८ नोव्हेंबर रोजी पदाची सूत्र आपल्या हाती घेणार आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी न्यायमूर्ती शरद बोबडे यांची सरन्यायाधीश पदी नियुक्ती करण्यात यावी अशी शिफारस विधी आणि न्याय मंत्रालयाला पत्र लिहून केली होती. सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ न्यायाधीश असलेल्या रंजन गोगोई यांनी ३ ऑक्टोबर २०१८ रोजी देशाचे ४६ वे सरन्यायाधीश म्हणून थपथ घेतली होती. ते १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे परंपरेनुसार आपला उत्तराधिकारी म्हणून आपल्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार वरिष्ठ असलेल्या न्यायाधीश बोबडे यांची शिफारस त्यांनी सरन्यायाधीश पदासाठी केली होती. बोबडे यांच्या नियुक्तीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली असून ते देशाचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.
कोण आहेत न्यायमूर्ती एस.ए.बोबडे? न्या. बोबडे हे नागपूरचेच आहेत. त्याच तूचा जन्म २४ एप्रिल १९५६ ला नागपुरात झाला.बोबडे यांचे वडील अरविंद बोबडे हे ज्येष्ठ विधिज्ञ आणि महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते.न्या. शरद बोबडे यांचे शालेय शिक्षण नागपुरातच झाले.त्यांनी १९७८ साली नागपूर विद्यापीठाद्वारे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालयातून एल.एल.बी पदवी संपादन केली. त्यानंतर नागपूर खंडपीठात वकिली सुरू केली.१९९८ साली त्यांना वरिष्ठ अधिवक्तापद बहाल करण्यात आले.२००० ला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आले. त्यानंतर १६ ऑक्टोबर २०१२ ला ते मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती झाले. १२ एप्रिल २०१३ ला त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अर्जन कुमार सिकरी यांचाही शपथविधी पार पडला होता. मार्च २००० मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून निवड झालेले न्या. बोबडे यांची २०१२ रोजी ऑक्टोबर मध्ये मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती. २०१६ साली नागपूरच्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाचे (नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचे) कुलपती म्हणून नियुक्त केले. नागपूर विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असणारे बोबडे हे नागपुरातील राष्ट्रीय विधि विद्यापीठाचे कुलपती झाले. भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून तब्बल दोन वर्षांचा कार्यकाळ लाभणार आहे. न्या. बोबडे हे २०२१ मध्ये निवृत्त होणार आहेत.