<
एरंडोल(शैलेश चौधरी )- येथील माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड यांचे सुपुत्र संघरत्न गायकवाड यांना ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स नाशिकतर्फे ‘कृषिथॉन युवा सन्मान २०१९’ राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यातील प्रयोगशील युवा उद्योजक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. २१ नोव्हेंबर रोजी आंतराष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनाच्या १४ व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले असुन त्यांना यावेळी ‘प्रयोगशील युवा उद्योजक’ म्हणुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. संघरत्न गायकवाड हे पदवीधर युवक असुन त्यांनी नोकरीकडे न वळता आपल्या वडिलोपार्जित शेती व्यवसाय करण्याकडे लक्ष घातले.त्यांनी आपल्या युवा बुद्धीचा वापर करुन हायटेक शेती केली व त्यात त्यांनी वडीलांच्या सहकार्याने वेगवेगळे प्रयोग केले.आपल्या २० गुंठे शेतात पॉलिहाऊस द्वारे विदेशी भाजीपाला लावला व मोठया प्रमाणावर उत्पन्न देखील घेतले. त्यांनी शेती हा उदयोग म्हणुन केली त्यात शेती संलग्न व्यवसाय केला. शेतात बंदिस्त शेळी पालन हा व्यवसाय देखील केला. १००शेळ्या यात त्यांनी पाळल्या आहेत. हा उपक्रम बघण्यासाठी अनेक तरुण तथा शेतकरी भेट देत असतात. याच बरोबर त्यांनी आपल्या शेतात उत्कृष्ट कुक्कूट पालन सुध्दा केले आहे,२००० पक्षांपासून सुरू केलेला हा व्यवसाय आता २५००० पक्षांवर येऊन ठेपला आहे. यात संघरत्न यांनी संपूर्ण जिल्ह्यात आपले नाव केले आहे. त्यांनी या व्यवसायात आपल्या सोबत अनेक युवा शेतकरी वर्गास मार्गदर्शन करुन हा व्यवसाय करण्यास प्रोत्साहित केले आहे. या त्यांच्या प्रेरणादायी वाटचालीचे सर्व स्तरांतून कौतूक होत आहे.