<
परिवर्तन तर्फे अनोखा उपक्रम वाघूर दिवाळी अंकाचे वाघुर नदीच्या काठावर प्रकाशन
जळगांव(प्रतिनीधी)- ‘वाघुर’ हा दिवाळी अंक महाराष्ट्रातला एक प्रसिद्ध साहित्यिक अंक म्हणून ओळखला जातो, जळगाव तालुक्यातील कडगाव येथील कवी नामदेव कोळी यांच्या संकल्पनेतून आणि मेहनतीतून वाघूर दिवाळी अंक दरवर्षी निघत असतो. कवी नामदेव कोळी या अंकाचे संपादक असून महाराष्ट्रातील साहित्यिक आणि वैचारिक क्षेत्रातील लेखकांचे साहित्य, कथा, कविता, ललित हे या अंकात प्रसिद्ध होत असतात. वाघूर दिवाळी अंकाचे यंदाचे हे पाचवे वर्ष आहे. अनोख्या अशा दिवाळी अंकाचे प्रकाशन परिवर्तनाच्या कलावंतांतर्फे वाघूर धरणावर जाऊन वाघुर नदीच्या साक्षीने करण्यात आले. याप्रसंगी या दिवाळी अंकातील कवितेचं आणि निवडक लेखांचं अभिवाचन देखील या करण्यात आले. श्रीकांत देशमुख यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रनाचे तसेच कवी अशोक कोतवाल, अस्मिता गुरव, यशवंत मनोहर यांच्यासह अनेक लेखक आणि कवींच्या साहित्याचं वाचन याप्रसंगी परिवर्तनाच्या कलावंतांनी वाघुर नदीच्या काठी वाघुरच्या साक्षीने अनोख्या पद्धतीने केलं. वाघुर नदीच्या काठी वाघूरचं प्रकाशन आणि त्यातील साहित्याचे वाचन ही अभिनव संकल्पना परिवर्तन तर्फे राबविण्यात आली. याप्रसंगी रंगकर्मी शंभू पाटील प्रा मनोज पाटील, डॉ. किशोर पवार चित्रकार विजय जैन, पालवी जैन, सोनाली पाटील,निलीमा जैन, योगेश चौधरी, अमोल सुर्वे, हर्षल पाटील हे परिवर्तनचे कलावंत उपस्थित होते. या अंकातील नीटनेटकेपणा तसेच उत्तम साहित्याची मांडणी व उत्तम संपादनातबद्दल कवी आणि संपादक नामदेव कोळी यांच्या मेहनतीचं आणि संपादन कौशल्याचे उपस्थितांनी कौतुक केलं. आणि खानदेशातून दर्जेदार दिवाळी अंक यानिमित्ताने निघतो आहे याचा आनंद परिवर्तनला आहे असं मत शंभू पाटील यांनी व्यक्त केलं. ज्याप्रमाणे वाघूर ही नदी खानदेशातील अनेक शहरं आणि गावांसाठी जीवनदायीनी आहे, त्याचप्रमाणे ‘वाघुर’ मधील साहित्य कविता लेख हे साहित्यिकांसाठी महत्त्वाचं केंद्र आहे, असं मत चित्रकार आणि कवी विजय जैन यांनी व्यक्त केलं.