<
जळगाव (दि.31) प्रतिनिधी – बांभोरी येथील जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. व भविष्य निर्वाह निधी जिल्हा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सतर्कता, जागरूकता सप्ताह साजरा करण्यात आला. यामध्ये भविष्य निर्वाह निधी संबंधीत विविध शंकांचे निरसन जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी करून घेतले. यासाठी भविष्य निर्वाह निधीचे साहाय्यक आयुक्त के. के. राजहंस यांनी मार्गदर्शन केले. जैन इरिगेशनच्या प्लास्टिक पार्क येथे आज झालेल्या सतर्कता, जागरूकता सप्ताहाप्रसंगी भविष्य निर्वाह निधी साहाय्यक आयुक्त के. के. राजहंस, भविष्य निर्वाह निधी प्रवर्तक अधिकारी रविंद्र जाधव, भविष्य निर्वाह निधीचे सेक्शेन सुपरवायझर अनिल बडगुजर उपस्थित होते. सतर्कता, जागरूकता व तक्रार निवारण या कार्यक्रमाद्वारे सर्व अधिकाऱ्यांनी जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांना इमानदारी व पारदर्शकतेबाबत ऑनलाईन प्रतिज्ञा दिली. तसेच भविष्य निर्वाह निधी संबंधी भविष्यातील होणारे फायदे, असलेल्या सुविधा समजून सांगितले. केवायसी व नॉमेनेशन बाबतही प्रत्येकाने विशेष जागरूक राहिले पाहिजे, जेणे करून पीएफ काढताना अडचण निर्माण होणार नाही असे मार्गदर्शन के. के. राजहंस यांनी केले. यावेळी जैन इरिगेशनचे बहुसंख्य सहकाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.
वत्कृत्व स्पर्धेत विक्रांत जाधव प्रथम
सप्ताहानिमित्त ‘इमानदारी एक जीवनशैली’ याविषयावर वत्कृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये सहा सहकारी सहभागी झाले. यामध्ये प्रथम क्रमांक विक्रांत जाधव यांनी पटकाविला. तर निखील कुलकर्णी यांनी द्वितीय, राजश्री पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. स्पर्धेतील विजेत्यांना भविष्य निर्वाह निधी साहाय्यक आयुक्त के. के. राजहंस यांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.