<
पाचोरा(प्रमोद सोनवणे)- तालुक्यातील शेतकरी परतीच्या बेमोसमी पावसामुळे १००% उध्वस्त झाला असून शेतातील ज्वारी मका कपाशी कापूस सोयाबीन या पिकांचे शंभर टक्के नुकसान झालेले असून त्या पिकांना सततच्या पावसामुळे अंकुर फुटलेले आहेत, अशी भयानक परिस्थिती पाचोरा भडगाव तालुक्यात निर्माण झाली असून शेतकरी हवालदिलझालेला आहे. पाचोरा भडगाव तालुक्यातील तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी यांची बैठक घेऊन त्यांना आदेश देण्यात आले होते की तात्काळ वरील पिकांचे पंचनामे करून तसा अहवाल दहा नोव्हेंबरच्या आत जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे सादर करावा.परंतु आज आ. किशोर पाटील, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार यांच्यासमवेत आज रोजी पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची पाहणी केलीअसता अत्यंत भयानक परिस्थिती दिसून आली. मका, ज्वारी, कपाशी, सोयाबीन, कापूस या पिकांना अति पावसामुळे अंकुर फुटलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकावर केलेला खर्च पूर्णतः पाण्यात गेला असून शेतकऱ्याचे १००टक्के नुकसान झालेल आहे. पाचोरा- भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर असून त्यांना या पावसामुळे दिवाळी सुद्धा साजरी करता आली नाही. कारण त्यांचा आता तोंडाचा घास या परतीच्या पावसाने हिरावून घेतला आहे. म्हणून आ. किशोर पाटील यांनी नव्याने आदेश देत तलाठी, कृषी, अधिकारी ग्रामसेवक यांनी शेतामध्ये प्रत्यक्ष पाहणी करण्यात वेळ खर्ची न घालता आपल्या सहकारी रेकॉर्डमध्ये पिकपेरा लावला असेल त्यानुसार सरसकट नुकसान भरपाई देण्याचा अहवाल जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे त्वरित सादर करावा आणि शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला शेतमजुराला तात्काळ मदत द्यावी. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पाचोरा भडगाव तालुक्यात सततच्या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाईची माहिती देऊन तात्काळ मदतीची मागणी करणार आहे.
अशी माहिती आ. किशोर पाटील यांनी आपल्या शिवसेना पक्ष कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली पत्रकार परिषदेला कृ.उ.बा. समितीचे माजी सभापती अँड. दिनकर देवरे, जि.प. सदस्य पदमसिंह पाटील, जिल्हा शिवसेना उपप्रमुख प्रा. गणेश पाटील, अँड. अभय पाटील शिवसेना जिल्हा उपप्रमुख पप्पू राजपूत, नाना वाघ, विजय भोई उपस्थित होते.