<
जळगाव – जिल्ह्यातील सांस्कृतिक वातावरण वृध्दींगत व्हावे यासाठी कार्यरत असणार्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखेच्यावतीने आज (दि.5) जागतिक मराठी रंगभूमीदिन छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे सकाळी 9.00 वाजता साजरा करण्यात येणार आहे.या जागतिक मराठी रंगभूमीदिनानिमित्त होणार्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखेच्या अध्यक्षा अॅड.सौ.रोहिणी खडसे खेवलकर तर केशवस्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नीळकंठअप्पा गायकवाड व कोषाध्यक्ष प्रेम कोगटा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सकाळी 9 वाजता नटराज व रंगभूमीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर नाट्यकलेचा वारसा सांगणारी नांदी व शाहीरी – लोककलांचा वारसा असणार्या कलांमधील गण सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 9.30 वाजता के.सी.ई. सोसायटीचे मूळजी जेठा महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाची समीर पेणकर लिखीत व हेमंत पाटील दिग्दर्शित ईदी या एकांकिकेचे सादरीकरण करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त नृत्य, नाट्य, संगीत क्षेत्रातील कलावंत आणि नाट्यरसिकांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखेच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील रंगकर्मी एकत्र येऊन दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी मराठी रंगभूमी दिन साजरा करणार आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव शाखेतर्फे बालगंधर्व खुले नाट्यगृह येथे रंगभूमी व नटराज पूजनाचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे.संगीत रंगभूमीला सुवर्णकाळ दाखविणार्या बालगंधर्वांच्या आजोळ असलेल्या जळगावला त्यांचा वारसा व इतिहासाची जपवणूक करणे अत्यंत गरजेचे असल्याने, हा कार्यक्रम बालगंधर्व खुले नाट्यगृह येथे करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांच्या प्रमुख़ उपस्थितीत नटराज पूजन व रंगभूमी पूजन करण्यात येणार आहे. तरी शहरातील सर्व रंगकर्मींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगावतर्फे करण्यात आले आहे.