<
नटराज पूजन करताना अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे खेवलकर व मान्यवर
जळगाव – येथील कर्मवीर छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे मराठी रंगभूमी दिन साजरा करण्यात आला.
सकाळी 9.30 वाजता झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ.भा. मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखेच्या अध्यक्षा अॅड.सौ.रोहिणीताई खडसे खेवलकर तर प्रमुख अतिथी म्हणून केशवस्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नीळकंठ अप्पा गायकवाड, नाट्य परिषदेचे जळगाव जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष संजय राणे व शंभू पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील, भुसावळचे ज्येष्ठ रंगकर्मी अनिल कोष्टी, यांची प्रमुख़ उपस्थिती होती. प्रास्ताविक चिंतामण पाटील यांनी केले. त्यानंतर ‘नमन नटवरा’ ही पारंपारिक नांदी मुख्य कार्यवाह अॅड.पद्मनाभ देशपांडे यांनी सादर केली. तसेच शाहीर विनोद ढगे व सहकार्यांनी गण सादर केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन व रंगभूमी पूजन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे नीळकंठ अप्पा गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, वास्तव जीवनातील घटनांवर भाष्य करणार्या नाट्यकलेतून समाज मन जागरुक करणार्या सर्व नाट्य कलावंतांचे कार्य अभिनंदनीय असून, जळगावात सांस्कृतिक वातावरण निर्मिती व्हावी यासाठी आमच्या संस्थेतर्फे करता येईल तेवढी मदत करण्यात येईल. अध्यक्षा अॅड. रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, विष्णूदास भावे यांनी 1843 साली सीता स्वयंवर हे नाटक रंगभूमीवर सादर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया रचला. या घटनेचे स्मरण म्हणून हा दिवस रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. आज युवक युवती या कलेकडे वळू लागले आहे. याचे शास्त्रोक्त शिक्षण घेण्याची सोयदेखील आता उपलब्ध झाली आहे. पण कलावंतांसोबतच प्रेक्षकही तयार होणे आता गरजेचे आहे. कलावंत जसा भूमिका करताना खोलात जाऊन त्याचा विचार करतो त्याचप्रमाणे प्रेक्षकांनीही नाटक केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून नाही तर अभ्यासपूर्णरित्या चिकित्सकदृष्टीने बघायला हवे. यातूनच समाजमन अनौपचारिकरित्या घडत जाईल. उपस्थित युवकांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, खूप पुस्तके वाचा, आजूबाजूची परिस्थिती पहा. सामाजिक, राजकीय निरीक्षण करा. भोवतालचा अभ्यास करा त्यातून तुमच्याच परिसरातील नव्या गोष्टी कळत जातील. त्यातूनच नव्या संहिता सूचतील व आपल्या मातीतील आपलं नाटक उभं राहिल. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हातर्फे जिल्ह्यातील सर्व कलावंत, लोककलावंत, तंत्रज्ञ यांना सोबत घेऊन नाट्य परंपरा पुढे नेत सांस्कृतिक वातावरण जोपासणे हे प्रमुख कार्य असून, विविध उपक्रम, प्रशिक्षण शिबिरे या माध्यमातून युवक युवतींना या परंपरेत सामील करुन घेण्याचे कार्य करण्यात येणार आहे. नाट्य परिषदेचे कार्य हे केवळ जळगाव किंवा भुसावळ या शहरांपुरते मर्यादित राहणार नसून, तालुका पातळीवर ते वाढून अधिकाधिक कलावंतांपर्यंतच पोहचण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप घोरपडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अॅड. पद्मनाभ देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोद ढगे, योगेश शुक्ल, अॅड.प्रविण पांडे यांनी परिश्रम घेतले.
दरम्यान, बालगंधर्वांची परंपरा सांगणार्या जळगाव शहरातील सांस्कृतिक ठेवा जतन करण्यासाठी अ.भा. मराठी नाट्य परिषद जळगाव शहर शाखेतर्फे बालगंधर्व खुले नाट्यगृहात महानगरपालिका आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांच्या हस्ते रंगभूमी व नटराज पूजन करण्यात आले. यावेळी दिपक चांदोरकर, सौ.सरिता खाचणे, सौ.मंजुषा भिडे, पियुष रावळ, दिपक चांदोरकर, सुभाष मराठे, प्रविण पांडे, चंद्रकांत अत्रे, भानुदास जोशी, अरविंद देशपांडे, तुषार वाघुळदे यांच्यासह रंगकर्मींची उपस्थिती होती.
मु.जे. महाविद्यालयात रंगभूमी दिन केसीई सोसायटीच्या कान्ह ललित केंद्रात रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, सदस्य चारुदत्त गोखले, हरिषभाई मिलवाणी, डी.टी. पाटील, सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, प्रा.किसन पाटील, स्वायत्त महाविद्यालयाचे प्रमुख डॉ.एस.एन.भारंबे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांनी सांगितले की, कान्ह ललित कला केंद्र उभारण्यामागे खान्देशातील सर्व विद्यार्थी कलावंतांना शास्त्रोक्त प्रयोगक्षम कलांचे शिक्षण उपलब्ध व्हावे व 16 कलांचे 64 विद्यांचे ज्ञान केसीई सोसायटीच्या ललित कला केंद्रामार्फत मिळावे, या उद्देशाने स्थापना करण्यात आली असून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा व जिल्ह्याच्या सांस्कृतिक जडणघडणीत हातभार लावावा. सूत्रसंचालन व आभार ललित कला केंद्राचे समन्वयक प्रा.हेमंत पाटील यांनी केले.
ईदी या एकांकिकेचा प्रयोग सादर
रंगभूमीदिनाचे औचित्य साधून केवळ नटराज व रंगभूमी पूजन करण्यासह कलेच्या माध्यमातून नटरंगाची सेवा व्हावी, या उद्देशाने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे ‘ईदी’ या एकांकिकेचा प्रयोग सादर करण्यात आला. केसीई सोसायटीचे मूळजी जेठा महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागातर्फे समीर पेणकर लिखीत व हेमंत पाटील दिग्दर्शित ईदी या एकांकिकेचा प्रयोग सादर करण्यात आला. काश्मीरी पंडितांच्या प्रश्नावर आधारित या एकांकिकेने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.