<
भडगाव-(प्रमोद सोनवणे)- गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ लोटला असेल पण आजही गुढे आणि जुवार्डी शिवारातील एकूण तब्बल दीड हजार एकर काळीभोर जमीन असलेल्या तसेच ९०,००० ते ९५,००० लिंबाची झाडे असलेल्या ह्या बळीराजाला साधा पायी चालण्याजोगा सुद्धा रस्ता नाही. आजही गुढे येथील शेतकरी, मजूर किमान ३ फूट पाणी आणि चिखल असलेल्या नाल्यातून पायपीट करत आपापले शेत गाठतात. गावकऱ्यांची अशी धारणा आहे कि येथे काही दशकांपूर्वी गुढे आणि जुवार्डी गावाला जोडणारा, २१ फूट रुंदी असणारा पुलापासून सरळमार्गी रस्ता होता. नंतर काही धनाढ्य समाजघटकांनी राजकारणी लोकांच्या मदतीने तो रस्ता फस्त करून टाकला. आणि पुन्हा भविष्यात शासकीय पाहणी झालीच तर आपण केलेला धूर्तपणा उघडकीस यायला नको म्हणून शेजारीच शेती असणाऱ्या आपल्याच काही भावंडांच्या शेतात जमाबंदी योजनेच्या काळात काही शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून नकाशावर तो रस्ता फेऱ्यातून का होईना टाकून घेतला. ज्या नाल्यातून रोज तब्बल १००० हुन अधिक शेतकरी, शेतमजूर, मेंढपाळ जीव मुठीत धरून वावरतात ते गुढे गाव एवढे धनाढ्य असून सुद्धा गावातल्या शेतकऱ्यांवर नाल्यातुन चालत जाण्याची परिस्थिती उद्भवते आहे हि बाब गावासाठी लज्जास्पद आहे. एका गृहस्थाने ४ वर्षांपूर्वी ह्या विषयावर आवाज उठवत न्याय मिळण्याची अपेक्षा चावडीवर व्यक्त केली होती तेव्हा ह्याच समाजकंटकांनी त्या निष्पाप गृहस्थांवर दमदाटी केली होती, आणि दुर्दैव असे कि गेल्या काही दिवसांपूर्वीच त्या गृहस्थांच्या भावावर त्याच शिवारात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने घाला घातला. पण दुर्भाग्य हे कि शेतातून दवाखान्यापर्यंत जायच्या आधीच त्यांची प्राणज्योत मालवली. नाल्यातून ये-जा करणे इतके अशक्य आहे कि एखाद्या व्यक्तीला शारीरिक समस्या उद्भवल्यास किमान २ तास तरी प्राथमिक उपचार पुरवले जाऊ शकत नाहीत. आणि ह्याच पार्श्वभूमीवर काही युवकांनी पुढाकार घेऊन नाल्याबद्दल मंत्री महोदयांकडे तक्रार करायचे ठरवले असता गावातून प्रतिसाद सुद्धा प्रचंड मिळाला. पण शेवटी गावात बोटावर मोजण्याइतकी संख्या असलेली दुर्जन शक्ती एवढी पॉवरफुल आहे कि त्यांनी तब्बल ४०० गृहस्थांना ज्यांनी स्वाक्षऱ्या दिल्या होत्या त्यांना घरोघरी जाऊन धमकावण्यास सुरुवात केली. जी समाजकंटके जुवार्डी शिवारातील त्यांच्या शेतात जात असताना दुसऱ्याच्या शेतातून लेखी रस्ता नसताना बळजबरी वापरतात ते मात्र अख्या गावातल्या भोळ्या जनतेला आमच्या शेतातल्या रस्त्याने वापरलास तर तिथेच आडवा करिन अशी धमकी देतात. त्याची परिणीती एवढी वाईट झाली कि त्या स्वाक्षरी करणाऱ्या गृहस्थांना रडत, भयभीत होत स्वाक्षऱ्या खोडाव्या लागल्या. आज ह्या विषयात संपूर्ण गाव दहशतीच्या काळ्या ढगांच्या सावलीखाली आले आहे. असो, शेवटी हि दुसऱ्यांदा उभारलेली चळवळ सुद्धा संपली, कारण आज त्या तरुणांमध्ये भयभीत मानसिकता आहे आणि ते ह्या विषयात माघारीचे सूर बोलायला लागले आहेत. पण ह्या विषयात ह्या तरुणांनी समाजहितासाठी किमान एवढी हिम्मत तरी केली, ह्याविषयी त्यांचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.