<
कापूस उत्पादक आनंदले, पहिल्याच दिवशी विक्रमी आवक
पाचोरा(प्रतिनीधी)- येथील गिरड रोडवरील गजानन जिनिंग प्रेसिंग मध्ये भारतीय कपास निगमचे ( सीसीआय) कापूस खरेदी केंद्र प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सुरू झाले असून शुक्रवार २२ रोजी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश शिंदे यांच्या हस्ते या कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ झाला . यामुळे शेतकरी आनंदले असून पहिल्याच दिवशी कापसाची विक्रमी आवक असल्याने कापूस उत्पादकांचा चांगला प्रतिसाद मिळणार असल्याचे सूचिन्ह निर्माण झाले आहे. गजानन जिनिंग-प्रेसिंग च्या प्रांगणात सतीश शिंदे यांच्या हस्ते काटा पूजन, कापसाची गाडी पूजन व कापूस पूजन करून खरेदी केंद्राचा शुभारंभ झाला याप्रसंगी नगराध्यक्ष संजय गोहिल, उपाध्यक्ष शरद पाटे, पतसंस्था फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष दत्ता बोरसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कल्पेश संघवी, धोंडू हटकर, गजानन उद्योग समूहाचे राजाराम सोनार, प्रमोद सोनार, डॉ दिनेश सोनार, शेतकरी भावलाल राठोड, बाबूलाल राठोड, सीसीआयचे लिपिक कमलेश खाकी, नगरसेवक राम केसवानी, नंदू पाटील, बाजार समीतीचे सचिव बी बी बोरूडे, अनिल पाटील आदी उपस्थित होते. खरेदी केंद्र शुभारंभा निमित्ताने प्रथम केंद्रात प्रथम आलेले शेतकरी आदेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या खरेदी केंद्रात ग्रेडर म्हणून नितीन साकरकर यांची नियुक्ती झाली असून अत्याधुनिक पद्धतीने कापसातील आर्द्रता तपासून व योग्य त्या कागदपत्रांची पडताळणी करून २ग्रेड मध्ये कापूस खरेदी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस आणावा कापसातील आर्द्रता बारा पर्यंत असावी. कापूस थोडा वाळवुन नंतरच खरेदी केंद्रावर आणावा. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त ताटकळत थांबावे लागणार नाही असे नितीन साकरकर यांनी स्पष्ट केले. तसेच शेतकऱ्यांनी कापूस विक्री बाबतची ऑनलाईन नोंदणी करावी, सोबत सातबारा उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, बँकेचा आयएफसी कोड, दोन पासपोर्ट फोटो सोबत आणावे व सहकार्य करावे असे आवाहन केले. याप्रसंगी ग्रेडर नितीन साकरकर यांनी शेतकऱ्यांना शासकीय खरेदी नियमावली संदर्भातील माहिती दिली. सतीश शिंदे यांनी मार्गदर्शन केले. प्रा सी एन चौधरी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले प्रमोद सोनार यांनी आभार मानले.