<
जळगाव- आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, रावेर, येथे 1 डिसेंबर, 2019 पासून 103 वे प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणांत आदिवासी उमेदवारांना विविध संस्थामार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा (गणित, सामान्यज्ञान, इंग्रजी व बुध्दीमत्ता) परिक्षांची तयारी घेतली जाते. प्रशिक्षणाकरीता उमेदवार किमान एस.एस.एसी पास असणे आवश्यक असून वय 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार आदिवासी (अनुसूचित जमाती) प्रवर्गाचा असावा. प्रशिक्षणाचा कालावधी 3 महिने 15 दिवसांचा असून प्रशिक्षण काळात प्रशिक्षणार्थी उमेदवारांना दरमहा 1 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येते. प्रशिक्षणाकरीता इच्छूक उमेदवारांनी त्यांचे अर्ज मुळ शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह, दोन पासपोर्ट साईजचे छायाचित्र, जातीच्या दाखल्याच्या साक्षांकित प्रतींसह 29 नोव्हेंबर, 2019 रोजी आदिवासी उमेदवारांकरीता रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, प्लॉट नं.2, शनि मंदिरामागे, स्टेशन रोड, पंचायत समिती जवळ, रावेर, जि.जळगाव येथे हजर रहावे. यापूर्वी या कार्यायलामार्फत प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी प्रशिक्षणासाठी हजर राहू नये याची नोंद घ्यावी. प्रशिक्षणाच्या साडेतीन महिन्याच्या कालावधीत उमेदवारांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था स्वत: करावी लागेल. तसेच मुलाखतीसाठी येतांना कोणताही प्रवासभत्ता दिला जाणार नाही, याची सर्व प्रशिक्षणात भाग घेवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी नोद घ्यावी. असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, रावेर, जि.जळगाव सौ. उषा सु. साळुंके यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.