Saturday, July 12, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“शरद पवार” हा सुद्धा “हाडामांसाचा माणूस” आहे, हे आपण विसरून गेलोय का?- विजय चोरमारे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/11/2019
in राजकारण, राष्ट्रीय, विशेष
Reading Time: 1 min read
“शरद पवार” हा सुद्धा “हाडामांसाचा माणूस” आहे, हे आपण विसरून गेलोय का?- विजय चोरमारे

शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचा दौरा सुरू केला होता 17 सप्टेंबरला. त्यानंतर तब्बल 73 दिवस अविश्रांतपणे 79 वर्षे वयाचे पवार राबत आहेत. या राबणुकीचे फळ म्हणजेच उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून झालेला शपथविधी! या शपथविधीने शरद पवार यांची लोकप्रियता राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातही टिपेला पोहोचली. शरद पवार यांच्यावरचा अविश्वसनीयतेचा शिक्का या घटनेनं साफ पुसून टाकला.

अनेक आजारांनी त्रासलेल्या पवारांनी सगळ्या आजारांवर मात करून सप्टेंबरच्या तिस-या आठवड्यात पायाला भिंगरी बांधली होती. भिंगरी म्हणजे तरी कशी? एक ऑक्टोबरला इस्लामपूरला जयंत पाटलांचा अर्ज भरून तिथून परांडा. तीन तारखेला मुंब्र्यात जितेंद्र आव्हाडांसोबत चार तास रणरणत्या उन्हात मिरवणुकीत उभे राहून तिथून जुन्नर, दुस-या दिवशी शशिकांत शिंदे यांच्याकडे कोरेगावला. तिथून कोल्हापूरच्या पश्चिम टोकाला राधानगरी. तिथून परत पारनेर, पारोळा. नुसतं ऐकून धाप लागते असला प्रवास या 79 वर्षांच्या म्हाता-यानं केला. क्वचित हेलिकॉप्टर वापरलं असेल. बहुतेक प्रवास रस्त्यानं.

2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षाला परस्पर पाठिंबा जाहीर केल्यामुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आणि नंतरची पाच वर्षे शिवसेनेची फरफट झाली. शिवसेनेच्या या अवस्थेला तसं पाहिलं तर शरद पवारच जबाबदार होते. राष्ट्रवादी काँग्रेसनं तेव्हा भाजपला पाठिंबा जाहीर केला नसता तर शिवसेनेला सत्तेत मोठा वाटा, तोही अधिक सन्मानपूर्वक मिळाला असता. परंतु राजकारणात काही निर्णय घ्यावे लागतात आणि तत्कालीन परिस्थितीने शरद पवारांन तसा निर्णय घ्यायला मजबूर केले होते. शरद पवार यांनी पाठिंब्याचा निर्णय घेऊन भाजपला उपकृत केले नसते तर गेल्या पाच वर्षांत पवारांचे अनेक सहकारी तुरुंगात जाण्याची भीती होती. परंतु आपल्या निर्णयामुळे शिवसेनेचे नुकसान झाल्याचा सल त्यांच्या मनात असावा. दुसरी गोष्ट अशी की शरद पवार कुणाचा हिशेब शिल्लक ठेवत नाहीत, चांगला किंवा वाईट अशा दोन्ही अर्थांनी. सुप्रिया सुळे यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठीच्या पहिल्या निवडणुकीवेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना समजल्यानंतर त्यांनी ती निवडणूक बिनविरोध घडवून आणली होती. शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनण्यासाठी आपले सारे कौशल्य पणाला लावून गेल्यावेळी घडलेल्या चुकीची भरपाईही केली आणि सुप्रिया सुळे यांना शिवसेनाप्रमुखांनी केलेल्या मदतीची परतफेडही केली.

पवारांनी 17 सप्टेंबरला सोलापूरपासून दौरा सुरू केला होता. त्यावेळी पक्षाची अवस्था अत्यंत केविलवाणी होती. अनेक सहकारी सोडून गेले होते. पक्षाला उमेदवार मिळतील की नाही, असे वाटण्याजोगी परिस्थिती होती. पक्षाचे इतर नेते, समर्थक, हितचिंतक हबकले होते. परंतु पवारांनी हिंमत सोडली नव्हती. खासदार अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरी यांच्या प्रमुख सहभागाने निघालेल्या शिवस्वराज्य यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत होता. खासदार उदयनराजे भोसले त्यात सहभागी होण्याची घोषणा केली होती, ते सहभागी झाले असते तर आणखी माहोल झाला असता, परंतु ऐनवेळी त्यांनी दगा दिला. ते शिवस्वराज्य यात्रेत सहभागी झाले नाहीतच, उलट खासदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी पक्षावर मोठा घाव घातला. अमोल कोल्हे, अमोल मिटकरी यांच्या भाषणांना प्रतिसाद मिळत असताना आणि चांगली वातावरणनिर्मिती होत असताना त्या यात्रेतही रटाळ भाषणे करणारी पक्षाची बडी धेंडे घुसली आणि शिवस्वराज्य यात्रेतला ताजेपणा, उत्स्फुर्तपणा घालवून टाकला. शरद पवारांना ते आवडले नव्हते, परंतु जे घडत होते ते रोखण्याची त्यांची मनस्थिती नव्हती. कारण सगळीकडूनच वारे उलटे फिरल्याची स्थिती होती. या नेत्यांना दुखावण्यामुळे त्यात भर पडण्याची शक्यता होती. म्हणून त्यांनी स्वतः सगळी प्रचाराची सूत्रे हाती घेऊन सोलापूरपासून प्रारंभ केला. सोलापुरात पवारांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आणि वैशिष्ट्य म्हणजे त्यात तरुणांचा मोठा सहभाग दिसून आला. हे वेगळेच चित्र होते. तरुण पिढीशी कनेक्ट तुटलेल्या शरद पवार यांच्याभोवती तरुण वर्ग जमा होऊ लागल्याची ही सुरुवात होती. भारतीय जनता पक्षाने सगळ्यांना अंकित केले असताना, सगळी प्रस्थापित धेंडे भाजपमध्ये गेली असताना एकटे शरद पवार मैदानात उतरले असल्याचे चित्र रोमहर्षक होते. या 79 वर्षांच्या लढवय्याला बळ देण्यासाठी त्यांच्याभोवती तरूणांची गर्दी होऊ लागली. दौरा जसजसा पुढे जाऊ लागला तसतशी ही गर्दी वाढू लागली आणि राज्यातील वातावरणही बदलू लागले. मोदी-शहा-फडणवीस यांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रसारमाध्यमांनाही या बदलाची नोंद घेण्यावाचून पर्याय उरला नाही. शरद पवार यांचा टीआरपीसुद्धा वाढू लागला. अनेक सहकारी सोडून गेले तरी शदर पवार यांनी कुणाबद्दल वाईट शब्द काढला नाही. उलट त्यांना शुभेच्छाच दिल्या होत्या. परंतु प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानंतर मात्र त्यांनी एकेकाची त्यांच्या गावात जाऊन आपल्या खास शैलीत अशी काही बिनपाण्याने केली की संबंधितांना ती आयुष्यभर लक्षात राहील. देवेंद्र फडणवीस सत्तेच्या उन्मादात, समोर पैलवान नाही वगैरे भाषा करीत होते. शोले सिनेमातले डायलॉग मारत होते. त्यांना पवारांनी हाताच्या एका इशा-याने असे काही उत्तर दिले की, त्यांनी पुढं पैलवान हा शब्दसुद्धा उच्चारला नाही. प्रसारमाध्यमांनी पवार घसरले… वगैरे गु-हाळ लावले, परंतु पवारांच्या झंझावातात ते फार काळ चालले नाही.

देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या एका टप्प्यासाठी सोलापूरला आलेल्या भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केले ? असा प्रश्न विचारण्याचे औद्धत्य दाखवले. त्यावर, मी महाराष्ट्रासाठ काय केले ही वेगळी गोष्ट आहे, परंतु कुठल्या चुकीच्या कामासाठी मी तुरुंगात गेलो नाही अशा शब्दात शरद पवार यांनी उत्तर दिले. तेच अमित शहा यांच्या जिव्हारी लागले. पुढं ईडीच्या नोटिसची जी भानगड उपटली त्याला पवारांनी दिलेलं हे उत्तर कारणीभूत होतं. आपण अजून म्हातारे झालेलो नाही… अजून लई जणांना घरी पाठवायचं आहे…, जे पक्ष सोडून गेले ते कितीही मोठे असले तरी सारे इतिहासजमा होतील… वगैरे षटकार मारून पवारांनी तरुणांची मनं जिंकत होते. राखीव मतदारसंघ झाल्यामुळे आमदारकीपासून दीर्घकाळ वंचित राहिलेल्या सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळच्या राजन पाटील आणि कार्यकर्त्यांनी पवारांवर जो विश्वास दाखवला तोही बळ देणारा होता. अनेक मोठी माणसं सोडून गेल्याचं वरवरचं चित्र असलं तरी असंख्य सामान्य कार्यकर्ते सोबत असल्याचा विश्वास मिळत गेला.

उदयनराजे सोडून गेल्यानंतर पवार पहिल्यांदाच साता-यात आले तेव्हा स्वागताला जमलेला जनसमुदाय थक्क करणारा होता. कोण आला रं कोण आला? मोदी-शहाचा बाप आला... अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. या घोषणेमध्ये त्यावेळी अतिशयोक्ती वाटत होती, परंतु मोदी-शहांचा अंतिम डाव उधळून लावल्यानंतर साता-यात दिलेली ती घोषणा किती सार्थ होती, याची कल्पना आली.

शरद पवार मधे दिल्लीत गेल्यानंतरचा त्यांचा दिनक्रम बघितला तरी थक्क व्हायला होतं. सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारापर्यंत अखंडपणे कार्यरत असलेले पाहायला मिळाले. अजित पवार यांचा शपथविधी झाला त्यादिवशीही सकाळी साडेसातच्या सुमारास कार्यरत झालेले पवार रात्र बारापर्यंत अखंड व्यस्त होते.

शरद पवार दिल्लीत गेले तरी काटेवाडीच्या सोसायटीवरसुद्धा त्यांचे लक्ष असते असे म्हटले जायचे. घार फिरे आकाशी... वगैरे शब्दात त्याचे उदात्तीकरणही केले जायचे. परंतु वस्तुस्थिती वेगळी होती. त्यांचे महाराष्ट्रातील बारीकसारीक गोष्टींवर लक्ष असले तरी महाराष्ट्र सरकारच्या कारभारात मात्र त्यांनी लक्ष घातले नाही. सगळे सहकारी सुजाण असल्यामुळे ते नीट काम करतील असा विश्वास त्यांना होता. 1999 ते 2004 या काळात सगळ्यांनी उत्तम काम करून तो सार्थ करून दाखवला. त्याचे फळ 2004 मध्ये मिळाले आणि 71 जागा जिंकणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. सत्तेच्या एका टर्मनंतर मात्र अनेक गोष्टी बिघडत गेल्या. केंद्रातीय युपीए -1 आणि युपीए-2 च्या काळात झाले, तशाच गडबडी महाराष्ट्रातही झाल्या. तिस-या टर्ममध्ये तर भ्रष्टाचाराबरोबरच सत्तेचा माज टिपेला पोहोचला आणि सरकार बुडाले. पर्वीचा अनुभव पाहता शरद पवार मागची चूक आता करणार नाहीत. ते सरकारच्या कामात हस्तक्षेप करणार नाहीत, पण नीट लक्ष ठेवतील. कारण सरकार आणण्यासाठी निवडणूक प्रचारात खस्ता त्यांनीच खाल्ल्या आहेत. काँग्रेस-शिवसेनेला एकत्र आणून आघाडी सरकारची निर्मिती त्यांनीच केली आहे. त्यामुळे काही वावगे घडले तर महाराष्ट्रातील जनता त्यांनाच जबाबदार धरणार आहे आणि जाबही विचारणार आहे. त्यामुळे हस्तक्षेप वाटेल एवढ्या प्रमाणात त्यांना कारभारात लक्ष घालावेच लागेल!

या सगळ्याच्या पलीकडं जाऊनही काही विचार करण्याची गरज आहे.

शरद पवार न थकता चालताहेत. बसताहेत. उठताहेत. चालताहेत. धावताहेत. 79 वर्षांच्या माणसानं कितीदा उठावं बसावं, किती चालावं, एका जागी उभं राहून किती बोलावं, दिवसातून किती सभा घ्याव्यात, किती मीटिंगा घ्यावात. कार्यकर्त्यांशी बोलावं. बैठका घ्याव्यात. नियोजन करावं. सगळंच आश्चर्यचकित करणारं आहे. ही ऊर्जा येते कोठून असा प्रश्न महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला पडलाय. चालता चालता पवारांच्या पायाला जखम झाली त्यामुळं स्टेजच्या पाय-या चढता-उतरताना त्यांना कुणाचातरी आधार घ्यावा लागायचा. प्रचाराच्या काळात झालेल्या जखमा अजून ब-या झालेल्या नाहीत. आता तर दोन्ही पायांच्या बोटांना जखमा झाल्या आहेत त्यामुळं दोन्ही पायांना बँडेज गुंडाळलेले दिसते. पवारांच्या शरीरावरच्या या जखमा फोटोमधून दिसताहेत तरी. परंतु अविश्रांत राबणा-या या 79 वर्षे वयाच्या म्हाता-याच्या मनावर जे घाव झालेत, त्यामुळं ज्या जखमा झाल्या आहेत, त्याचा विचार कधीच कुणी करताना दिसत नाही. माणूस केंद्रस्थानी ठेवून राजकारण-समाजकारण करणा-या पवारांच्यातल्या माणसाकडं, त्यांच्या दृश्य-अदृश्य वेदनांकडं पाहायला मात्र कुणाला सवड नाही. घरातल्या माणसांची दुखणी खुपणी बघणा-या, सगळ्यांची काळजी घेणा-या, त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी झटणा-या कर्त्या माणसाच्या मनाची अवस्था होते तशीच पवारांची होत असेल का? शरद पवार हे केवळ राजकीय चाली खेळणारे यंत्रमानव आहेत अशा रितीनं सगळे त्यांच्याकडं पाहतात.

शरद पवार हा सुद्धा एक हाडामांसाचा माणूस आहे, हे आपण विसरून गेलोय का?

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...

Previous Post

जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक समितीची सभा संपन्न

Next Post

तहसील व तलाठी कार्यालयातील कर्मचारी करताय कामात हलगर्जीपणा, नागरिकांची होतेय गैरसोय

Next Post
तहसील व तलाठी कार्यालयातील कर्मचारी करताय कामात हलगर्जीपणा, नागरिकांची होतेय गैरसोय

तहसील व तलाठी कार्यालयातील कर्मचारी करताय कामात हलगर्जीपणा, नागरिकांची होतेय गैरसोय

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications