<
जळगाव(प्रतिनीधी)- रोजच्या धकाधकीच्या व व्यस्त जीवनशैलीत आपण व्यायाम आणि योगाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. व्यायाम व योगासने यांचे फायदे माहीत असूनही या सवयी अंगी बाळगायला आपण टाळाटाळ करतो. जर आपण व्यायाम आणि योग यासाठी वेळ दिला तर अनेक आजारांपासून स्वत:चे संरक्षण करता येते.” असे माधवबाग चे ह्रदय रोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत याकुंडी यांनी प्रतिपादन केले. माधवबाग कार्डिअँक क्लिनिक, सोहम डिपार्टमेंट आँफ योग अँड नँचरोपँथी व क्रुती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या”स्वस्थ ह्रदयासाठी कार्यशाळा” या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. सदरची कार्यशाळा एम.जे.महाविद्यालयातील जुन्या काँन्फरन्स हाँलमध्ये आयोजित करण्यात आली होती. ब्लाँकेजेस म्हणजे काय, ते कसे तयार होतात, ब्लॉकेजेस असतांना आहार व व्यायाम काय असावा, एंजिओग्राफी म्हणजे काय, त्याला काही पर्याय आहेत का, ती टाळता येते का,माधवबाग चिकित्सा पध्दतीचा लाभ रूग्णांना कसा होतो यासारख्या अनेक समस्यांशी संबंधित समज गैरसमज,आणि तथ्य याबाबत डॉ. याकुंडी यांनी मार्गदर्शन केले. आहार, विहार, व्यायाम, विचार व दैनंदिन जीवनशैलीत योग्य ते बदल करून त्याला योगासनांची जोड दिल्यास ह्रदय रोग टाळता येतो. तथापि कोणताही व्यायाम किंवा योग तंत्रशुद्ध रित्या करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचं आहे. उच्च रक्तदाब, धुम्रपान, तंबाखू, कोलेस्ट्रॉल, मधुमेह ई.बाबतीत डॉ. याकुंडी यांनी शास्त्रशुध्दरित्या माहिती दिली. माधवबाग चे जेष्ठ समुपदेशक मिलींद सरदार यांनी पॉवर पोईंट प्रेझेंटेशन द्वारे ताण तणावाचे योग्यप्रकारे व्यवस्थापन करून त्याला योगासनांची जोड दिली तर निरामय व निरोगी आयुष्य निश्चितच जगता येते.याबाबत मार्गदर्शन केले. सोहम डीपार्टमेंट ऑफ योग आणि नेचरोपथीचे कार्य आणि चिकित्सा याबाबत समन्वयक अनंत महाजन यांनी माहिती दिली. कार्यशाळेचे प्रास्ताविक पोलिस बिनतारी संदेश विभाग जळगांवचे अमित माळी यांनी केले. माधवबाग जळगाव च्या प्रमुख डाँ.श्रद्धा माळी डॉ श्रेयस महाजन यांनी विविध रोग निवारण प्लॅन बाबत उपस्थितांना माहिती दिली. प्रा गौरी राणे, प्रा आरती गोरे, यशदा प्रबोधिनी पुणे चे जी.टी. महाजन प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. कार्यशाळा यशस्वीरीत्यापार पाडण्यासाठी सोहम डिपार्टमेंट आँफ योग अँड नँचरोपथी केंद्राच्या संचालिका डाँ.आरती गोरे, डाँ.सोनल महाजन यांचे सहकार्य लाभले. डॉ देवानंद सोनार यांनी सुत्र संचलन केले.