<
जळगाव(प्रतिनीधी)- अलवाडी ता. चाळीसगाव येथील मधुकर गंजीधर पाटील याने त्याच्या १५-१६ वर्षाच्या पुतणीचे लग्न करून टाकले, ही गोष्ट मधुकरचा मामा मयत शेषराव पंडित पाटील याने त्याचा मोठा बाबुराव पंडित पाटील यांस सांगितली व मला मधुकरने त्या लग्नाला बोलावले नसताना तु त्या लग्नाला का गेलास? असे विचारले. ही गोष्ट मधुकर गंजीधर व ईतर आरोपींनी ऐकल्यावर, त्यांनी सर्वांनी दि.३०-०४-२०१६ रोजी रात्री ८ वाजता शेषराव पंडित पाटील यास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यामुळे शेषराव याने आरोपींविरुद्ध मेहुणबारे पोलिस स्टेशनला दि.०१-०५-२०१६ रोजी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर शेषराव पंडित पाटील याने त्याच्या अलवाडी शिवारातील शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने त्याचे प्रेत दि.०२-०५-२०१६ रोजी शेतातील झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आले होते. सदर घटनेची खबर पोलिसांना देण्यात आल्यानंतर प्रेताचा पंचनामा करतेवेळी शर्टाच्या खिशात एक चिठ्ठी मिळुन आली होती. त्या चिठ्ठीत मयत शेषराव पाटील याने त्याच्या आत्महत्येस मधुकर गंजीधर पाटीलसह इतर जबाबदार असल्याचे नमुद केले होते. ती आत्महत्येबाबतची मयत शेषरावने लिहिलेली चिठ्ठी वाचल्यानंतर त्याचा मुलगा स्वप्नील शेषराव पाटील याने आरोपी मधुकर गंजीधर पाटीलसह इतरांवर भादंवि कलम ३०६, ३४ प्रमाणे गुन्हा रजिस्टर क्र.३०/२०१६ नुसार मेहुणबारे पोलिस स्टेशनला दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी मधुकर गंजीधर पाटील, भोला उर्फ शिवाजी नाना पाटील व प्रमोद पांडुरंग पाटील यांना अटक केली होती. आरोपी सरला मधुकर पाटील, पांडुरंग मुकुंदा पाटील, साहेबराव पांडुरंग पाटील, किशोर पांडुरंग पाटील व सुशिलाबाई पांडुरंग पाटील यांना जळगाव सेशन्स कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. दरम्यान आरोपी पांडुरंग मुकुंदा पाटील यांचे खटला न्यायप्रविष्ट असताना निधन झाले होते. सदर खटल्याचे चौकशीकामी सरकारपक्षातर्फे फिर्यादी स्वप्निल पाटील, त्याचा भाऊ संकेत पाटील, तपासी अंमलदार सहायक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाट व सहाय्यक पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांचेसह एकुण सहा साक्षीदार आले. साक्षीदारांच्या जबानीतील तफावती व अविश्वासार्हता तसेच तपासकामातील तृटी आदी बाबींचा विचार होऊन जळगाव येथील पाचवे सेशन्स कोर्ट आर एन हिवसे यांनी सर्व सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. सर्व आरोपींतर्फे अॅड. वसंत आर ढाके यांनी बचावाचे काम पाहिले. त्यांना अॅड. प्रसाद व्ही ढाके, अॅड. भारती ढाके व अॅड. शाम जाधव यांनी सहकार्य केले.