<
अमळनेर-(प्रतिनीधी)- दि.३१-०३-२०१७ रोजी मध्यरात्री दीड वाजेचे सुमारास फिर्यादी नाना ठाणसींग बारेला, रा. भिलवा, ता. भगवानपुरा, जि. खरगोन (मध्य प्रदेश) ह.मु. भाजी मार्केट परिसर, चोपडा, ता. चोपडा, जि. जळगाव यास गंभीर जखमी अवस्थेत चोपडा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते, तेथे नाना बारेला चोपडा पोलिसांकडे फिर्याद दिली की, काल दि.३०-०३-२०१७ रोजी तो स्वत: तसेच त्यांच्यासोबतचे सुभाष जगदीश बारेला, आसाराम सिताराम बारेला, सुरेश बारेला व चंपालाल बारेला असे सर्वजण चोपडा शहरातील रामपुरा कचरा डेपोच्या मागिल भागातील गहु, मका पेरलेल्या शेतात जर्मनची ईलेक्ट्रिक वायर चोरण्यासाठी गेले होते. रात्री १२ ते १२:३० वाजेचे सुमारास त्यांनी सदर ठिकाणावरील ईलेक्ट्रीक डीपी बंद केली व तेथील ईलेक्ट्रिक पोलवरील वायर तोडुन चोरलेली वायर घेऊन जात असताना मक्याच्या शेतातून अचानक ४ ते ५ ईसम पळत आले. त्यावेळी त्याच्यासोबतचे सुरेश बारेला, चंपालाल बारेला व आसाराम बारेला हे तिघे पळुन गेले. फिर्यादी नाना बारेला व सुभाष बारेला हे पळुन जात असताना त्यांना पकडुन त्यांचे हातपाय बांधून त्या दोघांना आरोपी विजय शिवाजी पाटील, मंगल बारकु माळी, भाईदास रिचा भिलाला, बाल-आरोपी महेश राजु पारधी यांनी त्या दोघांना पायावर, पोटावर, पाठीवर, डोक्यावर लोखंडी सळईने, काठ्यांनी, कमरेच्या पट्ट्याने व हातातील लोखंडी कड्याने बेदम मारहाण केली व रात्री एक वाजता त्यांना चोपडा पोलिस ठाण्यात हजर केले. फिर्यादी नाना बारेला व सुभाष बारेला हे दोघेही अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत असल्याने पोलिसांनी त्या दोघांना लगेच चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी सुभाष बारेला यास मृत घोषित केल्यामुळे पोलिसांनी नाना बारेला याच्या फिर्यादीवरून वर नमूद चार आरोपी व ईतर दोन अज्ञात आरोपी यांचेविरुद्ध चोपडा शहर पोलिस स्टेशनला भादंवि कलम ३०२, ३०७, ५०४, १४३, १४७, १४८ या कलमांनुसार गुन्हा रजिस्टर नं.४३/२०१७ प्रमाणे गुन्हा दाखल करून तिनही आरोपींना अटक केली. सदर खटल्याचे चौकशीकामी अमळनेर सेशन्स कोर्टात सरकारपक्षातर्फे एकुण सोळा साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या जबानीतील तफावती व अविश्वासार्हता तसेच तपासकामातील तृटी आदी बाबींचा विचार होउन अमळनेर येथील अतिरिक्त सेशन्स जज व्हि आर जोशी यांनी तिनही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.तिनही आरोपींतर्फे अॅड. वसंत आर ढाके, अॅड. प्रसाद व्ही ढाके, अॅड. भारती ढाके व अॅड. महेंद्र चौधरी यांनी काम बचावाचे काम पाहिले.