<
महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची वाळू माफियां सोबतची मिलीभगत येतेय कामात
जळगाव (विशेष प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यात वाळू ठेके पूर्णतः बंद असतांना रोज दिवसा ढवळ्या व रात्री महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून शहरालगतच्या बांभोरी व निमखेडी परिसरातून दररोज 80 ते 90 डम्पर,ट्रॅक्टर 24 तास वाळू तस्करी करत आहे.महसूल विभागाच्या गस्ती पथक कारवाया करत असल्या तरी महसूल च्या वरिष्ठ अधिकारी यांची वाळू तस्करी करणाऱ्यांची असलेली मिलीभगत आता कामात येत आहे.
गेल्या आठवड्यात महसूलच्या गस्ती पथकाने अनेक अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली आहे मात्र तरीदेखील वाळू उपसा अथवा वाळू वाहतुकीवर कुठलाही परिणाम झालेला नाही.कालच अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डम्पर ने धडक दिल्याने एकाला जीव गमवावा लागला आहे.तरीही महसूल विभागाला घाम फुटत नाही.
शहरीकरणासाठी वाळू आवश्यकच आहे. वाळूचे दरही नियंत्रणात राहणे आवाक्यातील घरांसाठी आवश्यक, तर दुसरीकडे सरकारी महसूल बुडता कामा नये. अशी कसरत सुरू असतानाच वाळू तस्करी आणि त्या आडून चालणाऱ्या गुन्हेगारीचे मोठे संकट निर्माण झाले आहे.
वाळू उपसा करण्यासाठी सर्व सरकारी नियम पायदळी तुडवून दिवसरात्र वाळूचा उपसा सुरू आहे. वाळू तस्करांनी त्यांची स्वतःची यंत्रणाही तयार केली असून ही यंत्रणाच आता महसूलच्या जीवावर उठली आहे. या लढाईत महसूल यंत्रणा मात्र हतबल झाल्याचे दिसत आहे.
राज्यातील शहरांचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे बांधकामासाठी वाळूची मागणी वाढली आहे. त्यासाठी नद्यांच्या पात्रातून अमर्यादपणे वाळूचा उपसा होत आहे. पूर्वी गावातील छोट्या मोठ्या बांधकामांपर्यंत मर्यादीत असणारी वाळूची मागणी प्रचंड वाढली आहे. या व्यवसायात अत्याधुनिक यंत्रांनी शिरकाव केला आहे. जेसीबी, पोकलेन अशा यंत्रांच्या मदतीने नदीपात्रातील वाळू उपसून शहरांकडे पाठवली जात आहे.या वाळू तस्करीवर तात्काळ नियंत्रित नाही केले तर शासनासह पर्यावरणाचे मोठे नुकसान होईल.
लवकरच वाचा – वाळू ठिय्या 324 ब्रास च्या नावाखाली सुरु असलेला गोरख धंदा