<
धरणगांव(प्रतिनीधी)- सध्या धरणगावात लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी अनेक हौसे, नवसे गवसेंच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे, जो तो आपल्या नावाची मुद्दाम चर्चा घडवून आणत आहे तर काही जण नगराध्यक्ष पद हे एकाच घराण्याची मक्तेदारी असून त्यांच्या घराण्यातील कर्त्या पुरुषाने दोन तीनदा हे पद भुषवूनही पुन्हा त्यांच्याच वारसाचा जन्म फक्त आणि फक्त नगराध्यक्ष पदासाठीच झाला आहे, अशी बढाई मारत आहेत. लोकांना आता बदल पाहिजे आहे. आदरणीय सलिमभाई पटेल यांचे कार्यकर्तृत्व मोठेच होते त्यांचे वारसदार हे वयाने, अनुभवाने नवखे आहेत. त्यांनी नगरसेवकापासून जर आपली राजकीय कारकीर्द सुरू केली तरच ते नगरपालिका प्रशासनाचा अनुभव घेऊ शकतील.व पुढे नगराध्यक्षही बनू शकतील. आपले नवनिर्वाचित मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब यांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवले नाही कारण ते नवखे आहेत. आमदार म्हणून ते आता विधानसभेचा अनुभव घेतील आणि कदाचित भविष्यात मुख्यमंत्री होतील ही, नगराध्यक्ष पदासाठी राजकीय पक्ष फिल्डिंग लावताना दिसत आहेत, वर्तमानपत्रातही बातम्या पुरवल्या जात आहेत, पण आमच्या सारख्या सामान्य नागरिकांना नगराध्यक्ष कोण असावा, याबाबतीतले मत काही विचारात घेतले जात नाहीये. सध्या नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा विचार केला तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांची एक मोट बांधली गेली आहे. धरणगावात शिवसेनेचे प्राबल्य पाहता या पदावर या तीनही मित्रपक्षातर्फे जिल्हा शिवसेना प्रमुख गुलाबभाऊ वाघ, दुसरे उमेश सुरेश चौधरी आणि अखेरचा अगदी प्रभावी पर्याय म्हणून सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सुनिलभाऊ चौधरी यांच्या नावाचा विचार झाला पाहिजे, अशी धरणगावातल्या विकासाची वाट पाहणार्या शिक्षित, बुद्धिवादी लोकांना वाटते. गेल्या निवडणुकीत सुनिलभाऊंना ऐनवेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट मिळाले होते. त्यावेळी त्यांना पक्षाने पाहिजे तशी मदत केली नव्हती, तरीही स्वकर्तृत्वावर त्यांनी ३९०० इतकी मते मिळवली होती. सुनिलभाऊंचे कार्य हे खणखणीत नाण्यासारखं आहे, त्यांनी स्वखर्चाने सोनवद रोडवरील स्मशानभूमीचे आधुनिकीकरण, धरणगावच्या सुरक्षेसाठी सीसी टीव्ही कॅमेरे लावणे, गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन सत्कार करणे, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी आर्थिक मदत करणे, गोरगरीबांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, दवाखाने सुरु करणे, जनरिक मेडिसिन कमी खर्चात देणे, अम्बुलन्सची सुविधा देणे याशिवाय सामाजिक बांधिलकीतून अनेकांना सहाय्य करणे ही त्यांच्या कामाची पावती आहे, धरणगावच्या विकासाची ब्लू प्रिंट त्यांच्याकडे तयार आहे. सुनिलभाऊ हे धरणगावच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील नेतृत्व, कर्तृत्व आणि प्रभृत्व या गुणांमध्ये सरसच आहेत.अशा व्यक्तीला जर शिवसेनेने तिकीट दिले तर दिलेल्या संधीचे ते सोनं करतील अशी ग्वाही देता येऊ शकते.जर या पक्षाचे तिकिट मिळाले नाही तर अपक्ष उमेदवार म्हणून सुनिलभाऊंनी उभे राहून तमाम धरणगावातल्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील बुद्धिवादी लोकांचे प्रतिनिधित्व करावे, असे मत धरणगांव वासी व्यक्त करत आहे.