<
जळगांव(प्रतिनीधी)- प.न.लुंकड कन्या शाळेत आज दप्तर मुक्त शनिवार या अंतर्गत पारंपरिक मैदानी खेळांचे महत्त्व सांगून विविध खेळ घेण्यात आले. मोबाईलच्या अतिवापरामुळे लहानग्यांना मैदानी खेळाचा विसर पडला आहे. त्यामुळे त्यांचे बालपण हरवून ती एकाच ठिकाणी गुंतून बसलेली दिसतात. आजच्या पिढीची ही घातक सवय मोडण्यासाठी प.न.लुंकड कन्याशाळेत दप्तरमुक्त शनिवार उपक्रमांतर्गत विविध पारंपारिक मैदानी मातीतील खेळ विद्यार्थीनींसाठी किती महत्त्वाचे आहेत हे समजावून सांगितले. सध्या मोबाईलमुळे घरातील घरपण हरवून मुलांमधील आणि पालकांमधील संवाद कमी होत असून पारंपरिक खेळापासून लांब जातांना दिसताय. पूर्वी विटी दांडू, लपंडाव, पकडापकडी, लगोरी, कबड्डी, खो खो आदी पारंपारिक व मैदानी खेळ खेळून मुले निरोगी व सदृढ होती, परंतु आजची पिढी मोबाईलच्या व्यसनाच्या अधीन होत आहे. परिणामी भावी पिढीचे आरोग्य धोक्यात आले आहे. दप्तरमुक्त अभियानाचा हेतूच हा आहे की मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा. त्यात आपले आरोग्यही महत्त्वाचे आहे. कारण सुदृढ नागरिकच देशाची प्रगती करू शकतील. म्हणून आज दप्तरमुक्त अभियानांतर्गत शाळेत लंगडी, दोरी उड्या, धावणे, मामाचे पत्र हरवले, लगोरी, आट्यापाट्या हे खेळ घेवून आरोग्याचे महत्त्व विद्यार्थीनींना समजावून सांगितले व दररोज विविध पारंपारिक खेळ खेळावेत याचेही आव्हान शाळेतील सर्वच विद्यार्थीनींना करण्यात आले. सदर स्पर्धेचे उद्घाटन शाळेच्या समन्वयिका सौ.पद्मजाताई अत्रे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.साधना भालेराव यांच्या हस्ते झाले. सदर उपक्रमाचे कौतुक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष सुशीलदादा अत्रे, चिटणीस अभिजीत देशपांडे, सदस्य प्रेमचंद ओसवाल, सदस्य शरदचंद्र छापेकर, शाळेच्या समन्वयिका सौ.रेवती शेंदुर्णीकर यांनी केले. सदर उपक्रमाचे मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका साधना भालेराव, पर्यवेक्षक गणेश महाजन यांनी केले. दप्तरमुक्त अभियानातील कार्यक्रम व विविध स्पर्धा यांचे नियोजन शाळेतील उपशिक्षक प्रवीण धनगर, व्ही.एस.पाटील, किशोर चौधरी हे दर शनिवारी शाळेत करतात. क्रीडा स्पर्धेचे नियोजन क्रीडा शिक्षिका मीना सपकाळे, शुभदा गर्गे, विशाल सपकाळे यांनी केले. सदर कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक शिक्षककेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.