<
जळगांव(प्रतिनीधी)- अमेरिके मधील ओहाव्हो कोलंबस या शहरात विनायक पर्वते यांनी बृहन महाराष्ट्र मंडळ या माध्यमातून मराठीसाठी रविवार शाळा सुरु केली आहे. महाराष्ट्रीयन मुलाना मराठी भाषा यावी, मराठी संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत. प्रत्यक्ष महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची गळचेपी सुरु असताना, मराठी शाळाना घरघर लागलेली असताना अमेरिकन मराठी लोकांना आपली भाषा जपाविशी वाटते हा मोठा धडा सर्व महाराष्ट्राला आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या जपणुकीसाठी बरोबरच मराठीच्या उंचीसाठी व वृद्धीसाठी संजीवनी फाऊंडेशन संचलित परिवर्तन संस्था नियमित कार्यक्रमांचे आयोजन करत असते. भाषा हा फक्त संवादाचा विषय नसून ती संस्कृतीचे वहन करत असते म्हणून आदिम काळापासून चालत आलेल्या या भाषेचे अस्तित्व टिकलं तरच आपल्या परंपरा आणि संस्कृतीचे अस्तित्व अबाधित राहील म्हणून भाषा ही अतिशय महत्त्वाची आहे. मराठी भाषेची सध्याची स्थिती आणि शैक्षणिक वर्तुळात महाराष्ट्रातच मराठी भाषेला मिळत असलेलं दुय्यम स्थान लक्षात घेता मराठीचं अस्तित्व हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय बनत आहे, यासाठी परिवर्तन संस्था विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करीत असते. यातून भाषेविषयीचा शोध घेणे आणि तिची जपवणूक करणे हा प्रामुख्याने उद्देश आहे या उपक्रमांतर्गत परिवर्तने अमेरिकेतील कोलंबस प्रांतातील ओहाव्हो या शहरातील मराठी भाषेविषयी आस्था प्रेम असणाऱ्या परिवारातील सदस्यांशी गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भूषण चौधरी व पल्लवी चौधरी हे जोडपं ओहाव्हो, कोलंबस येथे राहत आहे. हे दोघं मेकेनिकल इंजीनियर असून गेल्या वीस वर्षापासून अमेरिकेत राहत आहे. ते अमेरिकेत रहात असले तरी मनाने मात्र त्यांचे मराठीपण अजूनही जिवंत आहे. आपल्या मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी अमेरिकेत वास्तव्याला असलेल्या मराठी जनांच्या पुढील पिढीसाठी काहीतरी करता यावं यासाठी ते सतत धडपडत आहेत. ओहाव्हो शहरात राहतात त्या शहरातील जवळपास १२० मुलांच्या मुलांना मराठी भाषेचं ज्ञान देण्याचे काम पल्लवी चौधरी करत आहेत. आपली भाषा ही येणाऱ्या पिढ्यांना ही बोलता यावी, त्यांना भाषेचे महत्त्व पटवून फक्त बोलता येणं महत्त्वाचं नाही तर त्यात लेखन, वाचन हेही गरजेचे आहे. यासाठी त्यांची धडपड अमेरिकेत सुरू आहे. अमेरिकेतील मराठी भाषिकांच्या मुलांसाठी वेगळ्या प्रकारची पुस्तकं सोप्या आणि आकर्षक मांडणीत तयार करून भाषेविषयीचं अध्यापन प्रत्येक रविवारी त्या इतर सहकार्यांसोबत करत असतात. अमेरिकेत मराठी शिकवण हे खुप आव्हानात्मक काम आहे. ही भाषा का शिकावी हा प्रश्न मूल करतात, अनेक क्लास असतात त्या मधून हा आणखी जास्त खर्च करण , होमवर्क करण, परीक्षा देण या सगळ्यांसाठी वेळ व पैसे या दोन्ही स्तरावर आमचा संघर्ष आहे. विनायक पर्वते व गिरिजा पर्वते कुटुंबीय हे पूर्ण समर्पित काम करतात. या शालेसाठी त्यांनी आपले घर देखील उपलब्ध करून दिले आहे. अमेरिकेत राहून मराठी भाषेचे हे कार्य खूप मोठं आहे. याउलट महाराष्ट्रातील मराठी भाषेची शालेयस्तरावर स्थिती मात्र चिंताजनक आहे. यावेळी परिवर्तनाच्या कलावंतांनी संवाद साधत भाषेविषयीच्या कार्याविषयी जाणून घेतले. याप्रसंगी संस्थेच्या वतीने जेष्ठ गायिका सुदिप्ता सरकार यांनी महाराष्ट्रातील नाट्यकलेला वाहिलेल्या ‘रंगवाचा’ या प्रसिद्ध नियतकालिकाचा अंक देऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील, चित्रकार राजू बाविस्कर, नारायण बाविस्कर, वसंत गायकवाड, होरीलसिंग राजपूत, मंजुषा भिडे, प्रवीण पाटील, डॉ. किशोर पवार, मंगेश कुलकर्णी, मनोज पाटील, शरद पाटील, विनोद पाटील, मोना निंबाळकर, कुणाल चौधरी, निलिमा जैन, कल्पना जवरे, आदी उपस्थित होते.