<
जळगाव-(जिमाका) – अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ली व 2 रीच्या वर्गात प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्याची योजना आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे. इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत इयत्ता 1 ली व 2 रीत प्रवेश घेवू इच्छिणारा विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा, त्यासाठी संबंधित विद्यार्थ्याला त्याचे किंवा त्याच्या पालकांचे सक्षम अधिकाऱ्याने दिलेले अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रूपये 1 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे, इयत्ता 1 ली साठी प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याचे वय 30 सप्टेंबर, 2020 रोजी 6 वर्षे पुर्ण असावे. त्यानुसार त्याचा जन्म 1 ऑक्टोंबर, 2013 ते 30 सप्टेंबर, 2014 दरम्यानचा असावा. तर इयत्ता 2 रीच्या वर्गात प्रवेशासाठी विद्यार्थीने 2019-2020 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 1 ली मध्ये शाळेत प्रवेशित असल्याबाबतचे बोनाफाईड अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे आधारकार्ड असणे आवश्यक असून विद्यार्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, पालक शासकीय/निमशासकीय सेवेत नसावा. या योजनेंतर्गत ज्या पालकांना आपल्या पाल्यास इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळेत 1 ली व 2 री च्या वर्गात प्रवेश घ्यावयाचा आहे अशा पालकांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जि.जळगाव येथे प्रत्यक्ष पाल्याचा जन्मदाखला व आधारकार्डची साक्षांकित प्रत सादर केल्यांनंतर प्रवेश अर्ज 1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी, 2020 या दरम्यान वाटप केले जाणार आहे. पालकांनी परीपूर्ण भरलेला अर्ज 5 मार्च, 2020 पूर्वी सादर करावा. इयत्ता 1 ली व 2 रीच्या प्रवेशासाठी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी चोपडा, अमळनेर, एरंडोल, धरणगाव, जळगाव तालुक्यातील पालकांनी व पाल्यांनी 15 मार्च, 2020 रोजी बालमोहन विद्यालय, चोपडा, शिवकॉलनी शिरपुर रोड, चोपडा येथे उपस्थित रहावे. तर रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, बोदवड, भुसावळ, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव या तालुक्यातील पालकांनी व पाल्यांनी 15 मार्च, 2020 रोजी शासकीय आश्रमशाळा, डोंगरकठोरा, ता.यावल येथे उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालयाच्या 02585-261432/262035 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जि.जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.