<
जळगाव-(जिमाका) – राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात रविवार 19 जानेवारी, 2020 रोजी आरोग्य विभागामार्फत पल्स पोलिओ मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. पाच वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना पोलिओचा डोस देण्यात येवून जिल्ह्याचे लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट्य पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी सर्व संबंधितांना दिल्यात याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. डी. एस. पाटोडे, जागतिक आरोग्य बॅंकेचे डॉ. प्रकाश नांदापुरकर, जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्याधिकारी, भारत दुरसंचार निगम, परिवहन, शिक्षण, महसुल आणि आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पल्स पोलिओ लसीकरणाचे काम हे राष्ट्रीय कर्तव्याचाच एक भाग समजून या मोहिमेत आरोग्य विभागांसोबतच इतरांनीही सहकार्य करून जिल्ह्यात यापुढेही एकही पोलिओग्रस्त बाळ आढळणार नाही याची दक्षता घ्यावी. असेही यापंसगी जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी सर्व उपस्थितांना सांगितले. प्रारंभी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी.एस.पाटोडे यांनी जिल्ह्यातील आरोग्य विभागाने पल्स पोलिओ मोहिम यशस्वितेसाठी सुरू असलेल्या तयारीची माहिती दिली. तसेच आगामी पल्स पोलिओ मोहिम शंभर टक्के यशस्वितेसाठी संबंधित यंत्रणा करत असलेल्या कामांचा लेखाजोखा सादर केला. जिल्ह्यात येत्या 19 जानेवारी, 2020 रोजी देण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरणापासून जिल्ह्यातील 5 वर्षाखालील एकही बाळ वंचित राहू नये म्हणून घरोघरी जावून पल्स पोलिओची लस देण्याबराबरच एस.टी.स्टँड, रेल्वे स्टेशन, बाजार, यात्रा अशा वर्दळीच्या ठिकाणी लसीकरणासाठी बुध उभारून मोहिम शंभर टक्के यशस्वी करण्यात येईल असे सांगितले. डॉ. प्रकाश नांदापुरकर यांनी स्लाईडच्या माध्यमातून देश, राज्य आणि आपल्या जिल्ह्यात पल्स पोलिओच्या मोहिमेंतुन आतापर्यंत कशाप्रकारे पल्स पोलिओचे रूग्ण कमी-कमी होत जावून जिल्ह्यातून समुळ उच्चाटन झाले आहे हे समाजावून देतानाच जिल्ह्यात पोलिओ रुग्णांचे प्रमाण शून्य टक्के असले तरी शेजारील देशात अद्यापही याचे रुग्ण आढळत आहे आणि त्यात वाढ होत असल्याने ते राष्ट्र शेजारी असल्याने आपण गाफील न राहता अधिक सतर्क राहण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला.