<
जळगाव-जैन फार्म फ्रेश फुडस् लि. ही फळ व भाज्यांवर प्रक्रीया करणारी कंपनी असून फळ व भाज्यांच्या उपलब्धतेनुसार १९९५-९६ पासून दरवर्षी कायम कर्मचारीव्यतिरिक्त कंत्राटदारातर्फे हंगामी स्वरूपावर कामगार नेमणूक करत असते. तसेच उपलब्ध मालावर प्रक्रीया केल्यानंतर हंगामी कामगारांची सेवा कत्रांटदार संपुष्टात आणतात. फळ प्रकीया उद्योगात ही पध्दत सर्वदूर/ जगमान्य आहे. कत्रांटदारा मार्फत कार्य ही परंपरागत चालत असलेली पध्दत आहे. फळ व भाजीपाला मुळातच विशिष्ट काळात व मर्यादीत वेळेसाठीच उपलब्ध असतो. त्याचप्रमाणे या वर्षीही उपलब्ध मालावर प्रक्रीया करून झाल्यावर हंगामी कामगारांची सेवा कत्रांटदाराने संपुष्टात आणली व त्यांना पगार देण्यात आला. परंतु काही बाहेरील विघातक प्रवृत्तींनी या घटनेला वेगळे वळण देत कंपनी समोर गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. कंपनीने याची दखल घेतली आहे. हंगामी कामगारांना यापुढेही नेहमीप्रमाणेच कच्चा माल-फळे व भाजीपाला उपलब्धतेनुसार कंत्राटदारातर्फे विशिष्ट कालावधीसाठी काम मिळत राहील असे कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनीच्या कोणत्याही कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची सेवा खंडित केलेली नाही. या विषयी कंपनी संदर्भात सोशल मिडीया व इतर प्रसार माध्यमांमध्ये चुकीची माहिती जाऊ नये म्हणून हा खुलासा कंपनीने प्रसारित केला आहे.