<
विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे महत्व रुजण्यासाठी आयोजन
जामनेर(प्रतिनीधी)- तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वडाळी दिगर येथे १ जानेवारी २०२० या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून “वाढवूया आपला मान,करूया स्वच्छतेचा सन्मान” या उपक्रमास सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाविषयी माहिती देताना उपशिक्षक संदिप पाटील यांनी सांगितले की शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे महत्व रुजवणे फार महत्वाचे आहे यासाठी “”वाढवुया आपुला मान, करू स्वच्छतेचा सन्मान” हा उपक्रम वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सुरू केला आहे.या उपक्रमांतर्गत दररोज दैनिक परिपाठाच्या वेळेस विद्यार्थ्यांना स्वच्छता,नीटनेटकेपणा याविषयी माहिती देण्यात येईल व जे विद्यार्थी स्वच्छ गणवेशासह, नीटनेटक्या राहणीमानात व वेळेवर शाळेत उपस्थित असतील त्या विद्यार्थ्यांमधून उत्कृष्ट विद्यार्थी व विद्यार्थिनी निवडून त्यांचे कौतुक करण्यात येईल तसेच त्यांना सन्मानित करण्यासाठी त्यांना एक “विशेष बॅच” लावण्यात येईल. त्या “विशेष बॅच” मुळे विद्यार्थ्यांची वेगळी ओळख निर्माण झाली असेल याचा फायदा म्हणजे इतर विद्यार्थी देखील प्रेरणा घेतील व जास्तीत जास्त विद्यार्थी स्वच्छता, नीटनेटकेपणा हे गुण अंगीकारतील. या स्वच्छतेच्या सवयींमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य देखील चांगले व सुदृढ राहण्यास मदत होणार आहे. शाळेचे मुख्याध्यापक योगेश काळे यांचे मार्गदर्शन लाभत असून उपशिक्षक निलेश भामरे यांनी व्यवस्थापन केले. वाकोद केंद्राचे केंद्रप्रमुख रामचंद्र वानखेडे यांनी उपक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या आहेत.