<
जळगाव-राज्य शासनाने घोषित केलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या कर्जखात्याशी आधार क्रमांक संलग्न करून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे. राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या 27 डिसेंबर 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 जाहीर केली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सहकार विभागाच्या प्रधान सचिवांनी काही मार्गदर्शक सूचनाही निर्गमित केल्या आहेत. सदर योजनेंतर्गत राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमधील ज्या शेतकऱ्यांकडील 1 एप्रिल, 2015 ते 31 मार्च, 2019 पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त कर्जखात्यात अल्प मुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर, 2019 रोजी मुद्दल व व्याजासह थकीत व परतफेड न झालेली रक्कम 2 लाखांपर्यत आहे. अशा शेतकऱ्यांच्या कर्जांच्या कर्जखात्यात 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांचे कर्ज खाते त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे. तरी ज्या शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक बँकेकडे अद्याप नोंदविला नसेल. अशा शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक आपले कर्जखाते असलेल्या बँक शाखा, विकास सेवा सहकारी संस्थेकडे त्वरीत नोंदवून आपल्या कर्जखात्याशी संलग्न करून घ्यावा. जेणेकरून संबंधित शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ तात्काळ देणे शक्य होईल. अधिक माहितीसाठी जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था, प्रशासकीय इमारत, पहिला मजला, जळगाव या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.