<
जळगांव(प्रतिनीधी)- सीएए म्हणजे भारतीय नागरिकत्व कायदा हा १९५५ चा कायदा असुन, केंद्र सरकारने यात सुधारणा करून अफगाणिस्तान, पाकिस्तान,बांग्लादेश या देशातील ३१ डिसेंबर २०१४ पुर्वी भारतात आलेल्या हिंदू अल्पसंख्याक समाजाच्या शरणार्थी नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यासाठी तरतूद केली आहे. हा कायदा नागरिकत्व देणारा कायदा असुन मुस्लीम समाज किंवा इतर कोणत्याही समाजाची नागरिकत्वता काढून घेणारा कायदा नाही.तसेच एन आरसी कायदा हा आसाम वगळता भारतात कुठे ही लागू नाही किंवा सदर कायदा लागू करण्यासाठी अद्याप सरकारकडे कायद्याचा मसूदा ही तयार नाही. एनआरसी कायदा लागू झाल्यास भारतातील कोणत्याही नागरिकास याचा त्रास होणार नाही, याची पूर्ण खबरदारी केंद्र सरकार निश्चितच घेईल असा विश्वास भाजपा अल्पसंख्याक मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश सचिव अॅड.शहेबाज शेख यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेस सोबत काही डावे पक्ष,फक्त आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी मुस्लीम समाजात या कायद्यांबद्दल भीती निर्माण करुन व चुकीची माहिती पसरवून भारतात अशांतता माजविण्याचा तसेच हिंसाचार घडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु सदर कायदा हा मुस्लीम विरोधी नाही व या कायद्याने मुस्लीम समाजावर कोणताही अन्याय सुध्दा होणार नाही.त्यामुळे मुस्लीम बांधवांनी कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता,शांतता पाळुन सीएए कायदा नीट समजून केंद्र सरकारवर व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवावा असे आवाहन ही भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सचिव अॅड.शहेबाज शेख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.