<
शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे कृषि विभागाचे आवाहन
जळगाव-(जिमाका) – राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये राबविल्या जात असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पांतर्गत (पोक्रा) गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणास चालन देणे या घटकाचा समावेश केला आहे. गट शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने या प्रकल्पात गटामार्फत राबविल्या जाणाऱ्या कृषी व्यवसाय विषयक उपक्रमांना अनुदान दिले जाणार आहे. हवामान बदलामुळे शेतीवर मोठे परिणाम झालेले आहेत, त्यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासनाकडून जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (पोक्रा) राबविला जात आहे. यामध्ये विदर्भ-6, मराठवाडा-8 व खान्देशातील जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे. विविध पातळ्यांवर योजनेची अंमलबजावणी केली जात असून शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी यांच्याकरीता विविध प्रकारचे कृषी व्यवसाय करता येणार आहेत. त्यामध्ये गटात किमान खातेदार संख्या 11 तसेच समुहाचे क्षेत्र किमान 50 एकर असणे आवश्यक आहे. या घटकांतर्गत प्रस्तावित केलेल्या बाबींसाठी 60 टक्के अनुदान देय असून कमाल अनुदान मर्यादा ही रक्कम 30 लक्ष इतकी आहे.
तरी अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.