<
वेतनिका या संगणकीय प्रणालीमार्फत सुरू
जळगाव-(जिमाका)- सातव्या वेतन आयोगाच्या वेतननिश्चितीची वेतनपडताळणी वेतनिका या संगणक प्रणालीमार्फत सुरु केलेली आहे. नाशिक विभागातील सर्व नियंत्रण अधिकारी, कार्यालय प्रमुख, आहंरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येत आहे की, सद्यस्थितीत केवळ 1 जानेवारी, 2019 ते 31 जुलै, 2020 या कालावधीत सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांची सेवापुस्तके स्वीकारली जात आहेत. 1 जानेवारी, 2016 ते 31 डिसेंबर, 2018 या कालावधीतील पुस्तके स्वीकारणे स्थगित ठेवले असून 15 जानेवारी, 2020 पासून पुन्हा स्वीकारण्यास सुरूवात करण्यात येणार आहे. सातव्या वेतन आयोगाची वेतनिका प्रणालीतुन वेतननिश्चिती व वेतनपडताळणी करण्यासाठी सादर करताना संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मोबाईल क्रमांक/ई-मेल वेतनिका प्रणालीमध्ये नमुद करावा. जेणेकरून संबंधित पुस्तकांची पडताळणी झाल्यास याबाबतचा संदेश (मॅसेज) संबंधितांना जाईल व याबाबतची माहिती त्यांना वेळेत मिळू शकेल. सेवापुस्तके स्वीकारण्याची वेळ दुपारी 3.00 वाजेपर्यंत असून सेवापुस्तकांसोबत 20 जानेवारी, 2001 च्या शासन निर्णयानुसार पृष्ठ क्रमांक नमुद करून चेकलिस्ट जोडण्यात यावी. तसेच सेवापुस्तके परत घेताना मुळ पोहच पावती, प्राधिकारपत्र व ओळखपत्र दाखविणे बंधनकारक राहील. वेतनिका प्रणाली पुर्णपणे पारदर्शक असून प्राप्त झालेली सेवापुस्तके प्रकाराने क्रमवार (First In Fitst Out) या पध्दतीने निकाली काढली जातात. वेतनिका प्रणालीतून पुस्तके पाठवितांना संबंधित कर्मचाऱ्यांचा/निवृत्त कर्मचाऱ्यांचा मोबाईल क्रमांक ई-मेल प्रणालीमध्ये नमुद करावा. सेवापुस्तकांची पडताळणी झाल्यास त्याबाबतचा संदेश संबंधितांना जाऊन माहिती मिळू शकेल. पडताळणीसाठी प्राप्त झालेली सेवापुस्तके क्रमवार निकाली काढली जातात. क्रम डावलून कोणतेही पुस्तक काढली जात नाही. काही त्रयस्त व्यक्ती संबंधित अधिकारी/कर्मचारी यांना सेवापुस्तके क्रम डावलून लवकर करून देण्याबाबत अमिष दाखवून वेतन पडताळणी पथकाबाबत गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तरी सर्व कार्यालय प्रमुखांना याची योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहन सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक नि. तु. राजुरकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.