<
जळगाव-(जिमाका) – ज्या शेतकऱ्यांनी पीक लागवडीसाठी व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकांकडून पीककर्ज घेतले आहे. अशा शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने दुष्काळसदृष्य परिस्थिती, अवकाळी पाऊस, तसेच पिकांचे नुकसान, पुनश्च लागवडीकरीता कर्ज उपलब्ध न होणे, या कारणास्तव महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ जाहीर केलेली आहे. या योजनेमध्ये १ एप्रिल, २०१५ ते ३१ मार्च, २०१९ या कालावधीमध्ये वाटप केलेले अल्पमुदत पीक कर्ज तसेच याच कालावधीमधील वाटप केलेले पीक कर्ज ज्याचे पुनर्गठन केलेले आहे, अशा पुनर्गठीत कर्जाचे व पीक कर्जाचे ३० सप्टेंबर, २०१९ अखेर थकबाकीची मुद्दल व व्याज अशी कमाल रक्कम दोन लाख रुयांपर्यंत प्रती शेतकरी मर्यादा असणार आहे. जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जळगाव या बँकेकडून १ एप्रिल, २०१५ ते ३१ मार्च, २०१९ या कालावधीमध्ये ८१० कोटी रूपयांची थकबाकी असुन १ लाख ८१ हजार शेतकरी थकीत आहेत. शिवाय इतरही व्यापारी बँकांकडे अशा पध्दतीचे अनेक शेतकरी थकीत आहेत. हे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहे. या शेतकऱ्यांनी त्यांचे कर्जखात्यावर आधारकार्ड क्रमांक जोडणे आवश्यक आहे. याशिवाय कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांना कोणताही अर्ज करण्याची आवश्यकता नाही. या योजनेकामी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. तरी सर्व पात्र शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव, जिल्हाधिकारी कार्यालय, संबंधित तहसिलदार कार्यालय व सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच शेतकऱ्यांनी त्यांचे कर्जखाते ज्या व्यापारी किंवा राष्ट्रीयकृत बँकेत आहेत, अशा शाखेत व जे खातेदार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे कर्जदार सभासद आहेत, त्यांनी संबधित शाखेशी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अथवा त्यांची शाखा यांच्या संपर्कात रहावे. या योजनेमध्ये पात्र होणेकरीता कर्जखात्याशी आधारकार्ड क्रमांक संलग्न करणे आवश्यक असल्याने संबधित शेतकऱ्यांनी तात्काळ आपले कर्ज खाते ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष संपर्क करून आपल्या आधार क्रमांकाची व थकीत कर्ज रक्कमेची खात्री करून घ्यावी. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मेघराज राठोड यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.